राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पालिका आरोग्य विभागामार्फत चाललेल्या भरती प्रक्रियेंतर्गत बुधवारी ‘एएनएम’ पदासाठी शेकडो महिला उमेदवारांची गर्दी झाली. कंत्राटी स्वरूपात एएनएमची ८६ पदे भरली जाणार आहेत. या प्रक्रियेंतर्गत उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली जाणार आहे.
महापालिका आरोग्य विभागाने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत सुरू केलेल्या भरती प्रक्रियेंतर्गत बुधवारी महापालिकेचे मुख्यालय महिला उमेदवार, त्यांची लहान बालके आणि नातेवाईकांनी गजबजून गेले. राजीव गांधी भवन मुख्यालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. ९ एप्रिलपासून सुरू झालेली भरती प्रक्रिया महिनाभर चालणार आहे. त्याअंतर्गत नर्स-मिडवाइफची ६०, एएनएमची ८६, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी १२, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी १०, फार्मासिस्ट १८ आणि लॅब टेक्निशियन्सची १५ पदे भरली जाणार आहेत. ही सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची आहेत. पहिल्या सात दिवसांत नर्स-मिडवाइफ पदाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. २०० पात्र उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर ६० उमेदवारांना नियुक्तीपत्रही देण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी सांगितले. बुधवारी एएनएम पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार होते. पदांच्या संख्येच्या तुलनेत अर्जदार युवती व महिलांची संख्या २० ते २५ पटीने अधिक होती. सकाळी आठपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वी, उमेदवारांनी रांगा लावल्या होत्या. अर्जदार युवती व महिलांसमवेत त्यांचे कुटुंबीय, मुले सोबत होती. यामुळे पालिका आवार सकाळपासून गजबजले होते. दुपापर्यंत शेकडो उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. रात्रीपर्यंत अर्जाची छाननी करून गुरुवारी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.