जनलोकपाल विधेयकासाठी लोकशाही मार्गाचा लढा सोडून द्या, देशात लष्करी राजवटीचा आग्रह धरा, अन्यथा तुमचाही नरेंद्र दाभोलकर करू अशी धमकी ज्येष्ठ समाजसेवक अम्णा हजारे यांना पोस्टाच्या पत्राद्वारे देण्यात आली आहे. या धमकीच्या पाश्र्वभूमीवर हजारे यांचे वकील मिलिंद पवार यांनी हजारे यांना झेडप्लस सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हजारे यांना देशभरातून दररोज असंख्य पत्रे येतात. गुरूवारच्या टपालात हे पत्र आले, त्याची वाच्यता आज झाल्याने खळबळ उडाली आहे. हजारे यांच्या कार्यालयाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी त्यासंदर्भात नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना शनिवारी दुपारी माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामीण पोलीस अधीक्षक सुनीता जामदार, पारनेर ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांना राळेगणसिद्घीला पाठविले. जामदार तसेच ढोकले यांनी हजारे वास्तव्य करीत असलेल्या जागांची पाहणी करून आवश्यक तेथे सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात, तसेच हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. हजारे शनिवारी सायंकाळी राळेगणसिद्घीत पोहचले असून तत्पुर्वीच येथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
या पत्रात हजारे यांचा उल्लेख ‘क्रांतिसूर्य’ असा करण्यात आला आहे. मात्र सशस्त्र क्रांतीशिवाय देशातील जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी ईजिप्तचे उदाहरण देण्यात आले आहे. तुमच्या मरणानंतरही राजकारणी जनलोकपाल विधेयक मंजूर करणार नाहीत, त्यासाठी लोकशाही मार्ग सोडून देशात लष्करी राजवटीची मागणी करा, त्याशिवाय राजकारणी सरळ होणार नाहीत. तुम्ही हे न केल्यास तुमचाही नरेंद्र दाभोलकर करू, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. ६० वर्षे सत्ता भोगूनही काँग्रेस देशातील गरिबी दूर करू शकली नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशात ७० टक्के लोक गरीब आहेत. अजूनही २७ कोटी जनतेला दोन वेळचे अन्न मिळत नाही. राज्यात ३५ हजार बालके कुपोषित आहेत. नक्षलवाद्यांच्या मागण्या त्वरित मान्य होतात, पण आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात, असेही या पत्रात म्हटले आहे.
राळेगणसिद्घी परिवाराकडून निषेध
हजारे यांना आलेल्या या धमकीचा राळेगणसिद्घी परिवाराने निषेध केला असून अशा भ्याड धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे सरपंच जयसिंग मापारी यांनी म्हटले आहे. ज्यांना धमकी द्यायची, त्यांनी नावानिशी द्यावी, त्यांच्याशी दोन हात करण्यास आम्ही सक्षम आहोत. यापूर्वी अण्णांना मारण्यासाठी सुपाऱ्या देण्यात आल्या, हल्लेही झाले मात्र हजारे यांनी त्याचा खंबीरपणे मुकाबला केल्याचे मापारी यांनी सांगितले. निनावी पत्र पाठविणाऱ्याच्या हेतूचीही चौकशी करण्याची मागणी मापारी यांनी केली आहे.