मनसेचे अध्यक्ष  राज ठाकरे हे येत्या २२ फेब्रुवारी रोजी सोलापूरच्या भेटीवर येणार असून त्या दिवशी त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु निश्चित केलेले सभेचे ठिकाण कोल्हापूरचा अनुभव विचारात घेता तोकडे पडण्याची शक्यता विचारात घेऊन आता सभेसाठी अन्य मैदानांचा शोध मनसेची मंडळी घेत आहेत.
राज ठाकरे यांची जाहीर सभा महापालिकेसमोरील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर आयोजिली आहे. या मैदानाची क्षमता सुमारे २५ हजार व्यक्तींएवढी आहे. या मैदानावर सभेची तयारी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. तथापि, नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेला नागरिक व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होऊन सभेचे मैदान तोकडे पडले होते. राज ठाकरे यांचे निम्मे भाषण संपत असताना देखील सभेच्या ठिकाणी गर्दी वाढतच होती. ही वाढती गर्दी अनावर होण्याच्या शक्यतेने अखेर पोलिसांनाच सभेच्या मंचावर राज ठाकरे यांना चिठ्ठी पाठवावी लागली आणि त्यामुळे त्यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले होते. हा अनुभव विचारात घेता सोलापुरातही राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी निश्चित केलेले नॉर्थकोट प्रशालेचे मैदान कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यापूर्वी राज ठाकरे यांच्या सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झाल्या होत्या. परंतु शालेय परीक्षांमुळे हे मैदान येत्या २२ फेब्रुवारी रोजी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे संयोजकांना नॉर्थकोट प्रशालेचे मैदान निश्चित करावे लागले. राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता असल्यामुळे नॉर्थकोट प्रशालेचे मैदान तोकडे पडण्याची भीती मनसेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नॉर्थकोट मैदानापेक्षा जास्त विस्ताराचे मैदान उपलब्ध होण्यासाठी मनसेची मंडळी प्रयत्नशील आहेत. शहरात विराट सभा होण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ऐतिहासिक होम मैदान होय. या ठिकाणी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी,काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींपासून ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे नेते प्रमोद महाजन आदींच्या विराट सभा झाल्या आहेत. सुमारे दोन लाखांची गर्दी सामावून घेण्याची या होम मैदानाची क्षमता आहे. परंतु हे मैदान उपलब्ध नाही. रेल्वे विभागाच्या भय्या चौकातील क्रीडांगण उपलब्ध होण्यासाठी मनसेच्या वतीने रेल्वेकडे संपर्क साधण्यात आला असता हे मैदानही उपलब्ध होण्यास अडचणी दिसून आल्या.