अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर जादूटोणाविरोधी अध्यादेश काढणाऱ्या सरकारने आता हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करावा अशी आग्रही मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तनवादी संघटनांनी काढलेल्या मोर्चात करण्यात आली. अघोरी चालीरितींविरोधात पुकारलेली ही लढाई यशस्वी झाल्यास महाराष्ट्राचा आदर्श ठेवून केंद्र सरकारतर्फेही असा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करता येईल, असे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी नमूद केले.
भायखळय़ातील राणीबाग ते आझाद मैदान असा प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी काढण्यात आला. हजारो लोक यात सहभागी झाले होते. हा मोर्चा आझाद मैदानात आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट-रंगभूमीवरील कलावंत, विविध राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. दाभोळकरांच्या हत्येला १०० दिवस उलटूनही अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात आलेल्या अपयशाबद्दलही सरकार आणि पोलिसांवर यावेळी टीका करण्यात आली. दाभोळकरांच्या हत्येचा सीबीआय तपास करण्याची मागणी लावून धरायला हवी, असेही प्रकाश करात म्हणाले.
वारकरी संप्रदायाचा या कायद्याला विरोध असल्याचा गैरसमज राजकीय मंडळी काही जणांना हाताशी धरून पसरवत असल्याची संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी सेवा समितीचे ज्ञानेश्वर वाबळे यांनी सांगितले. तर विरोधी पक्षांमुळे हा कायदा होत नव्हता हा राज्य सरकारचा दावा हा खोटा असल्याचे प्रा. एन. डी. पाटील यांनी सुनावले. भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर, खासदार हुसेन दलवाई, आमदार विद्या चव्हाण, अभिनेत्री अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, नंदू माधव, शाहीर संभाजी भगत आदी मंडळी या मोर्चात उपस्थित होती.