16
गंगापूर रस्त्यावर सुरू झालेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी राजकीय पदधिकाऱ्यांशी संबंधित हॉटेलच्या अतिक्रमणांवरही हातोडा पडल्याने या कारवाईतून कोणाचीही मुक्तता होणार नसल्याचा संदेश देण्यात आला आहे. पथकाने राजकीय पदाधिकाऱ्यांसह सरसकट सर्व अतिक्रमणे हटविण्याकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे जेहान सर्कल ते सोमेश्वपर्यंतच्या टप्प्यातील काही व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. मुख्य रस्त्यावरील व्यापारी संकुलातील वाहनतळावरील जागेचे अतिक्रमण हटविले जात असले, तरी पुढील काळात त्या ठिकाणी पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेला दक्षता घ्यावी लागणार आहे. माजी आमदार व इतर पदाधिकाऱ्यांशी संबंधित हॉटेलच्या अतिक्रमणांवर पथकाने हातोडा टाकल्याने अतिक्रमण वाचविण्याची धडपड करणाऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही. दोन दिवसांच्या धडक कारवाईमुळे गंगापूर रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे दिसत आहे.
व्यापारी संकुलातील वाहनतळाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत होती. परिणामी, वाहतूक कोंडीसह लहान-मोठे अपघात नित्याचे झाले होते. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर धडक मोहीम सुरू झाल्यामुळे शहरातील विद्रूपीकरण कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. आदल्या दिवशी पालिका पथकाने रावसाहेब थोरात चौक ते जेहाल सर्कल भागातील अतिक्रमणे हटविली होती. मंगळवारी सकाळपासून गंगापूर रस्त्यावरील पुढील टप्प्यात काम सुरू झाले. जेहान सर्कल ते बारदान फाटापर्यंतच्या रस्त्यावर हॉटेल व्यावसायिक, विक्रेते, संस्था आदी सर्वाची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली.
सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, प्रमुख रस्त्यांच्या वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिकेच्या अतिक्रमण विभागाने घेतला आहे. त्यात प्रमुख रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सकाळीच पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला. पूर्वसुचनेनुसार अतिक्रमणधारक आपले शेड्स, ओटे, तसेच अन्य साहित्य काढून घेतील असा अंदाज होता. मात्र अनेकांनी तसे न केल्यामुळे पथकाने जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम हटविणे सुरू केले. यावेळी रस्त्याच्या कडेला लागून असलेली हॉटेलची अतिक्रमणे, शेड्स, ओटे यावर बुलडोझर, जेसीबी चालविण्यात आले. जेहान सर्कलनजीक हॉटेल मकालु, पोद्दार फार्म तसेच लॉन्सच्या अतिक्रमित बांधकामाकडे पथकाने मोर्चा वळवला. यावेळी पोद्दार फार्मच्या प्रवेशद्वारावर पक्क्य़ा स्वरूपात स्वागतासाठी खास कमान तयार करण्यात आली होती. ही कमान जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. तसेच याच रस्त्यावर एका खासगी फर्मचे नवीन अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज असे कार्यालय आहे. अतिक्रमण काढण्याची पूर्वसूचना देऊनही कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला. परिणामी, कार्यालयावर हातोडा पडणार असताना पथकाकडून १० मिनिटांचा कालावधी मागून घेतला. या कालावधीत कार्यालयातील संगणक, अत्यावश्यक कागदपत्रे, काही चीज वस्तूंसह फर्निचर काढून घेतले. यानंतर पथकाने कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जेसीबीने धक्का दिला. बॉबीज हॉटेलचे शेड यावेळी काढण्यात आले.
दरम्यान, मोहीम सुरू झाल्यावर काही व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. दुपापर्यंत बारदान फाटय़ापर्यंत पोहचलेले हे पथक माघारी येत असताना अतिक्रमणधारकांना उर्वरित अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले. या रस्त्यावर अनेक राजकीय पदाधिकारी व त्यांच्या नातलगांची हॉटेल्स आहेत. त्यांना अभय दिले जाईल अशी साशंकता व्यक्त केली जात असताना पथकाने कोणताही मुलाहिजा न ठेवता ती उद्ध्वस्त केली. पालिकेतील मनसबदारांच्या काही हॉटेल्सचा त्यात समावेश आहे. पालिका पदाधिकाऱ्यांची अतिक्रमणे उद्ध्वस्त झाल्यामुळे आपले अतिक्रमण वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम हटविले गेले, तिथे पुन्हा तसे बांधकाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

मोहीम सुरूच राहणार
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या दृष्टीने वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. काम पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरू राहील.
जयश्री सोनवणे (विभागीय अधिकारी, पश्चिम)