शेतात काम करताना सर्पदंशाने होणारे शेतकऱ्यांचे मृत्यू टाळण्यासाठी मोन्सॅन्टो इंडिया ह्य़ुमन राईट्सने सापाच्या विषापासून रक्षण करणारा ‘अँटी व्हेनम प्रोग्राम’ सुरू केला आहे. या अंतर्गत विदर्भातील पाच तालुक्यांमध्ये विष विरोधी किट्सचे वितरण करण्यात आले असून यामुळे चौघांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक व गुजरातमध्ये कंपनीने हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत ५५ व्यक्तींचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. ग्रामीण भागातील लोकांना सापाच्या चाव्यानंतर कोणते वैद्यकीय उपचार करावे, याची माहिती नसल्याने मृत्यू होण्याची शक्यता असते, अशा प्रकारची प्रकरणे हाताळण्यासाठी गावातील डॉक्टरांना विष विरोधी किट्स उपलब्ध करून देणे आणि लोकांना कार्याक्रमांद्वारे शिक्षित करणे या बाबींचा या उपक्रमात समावेश आहे.
विदर्भातील देऊळगावा राजा व लोणार या दोन तालुक्यांसह राज्यातील पैठण, टेंभुर्णी व राजूर अशा पाच तालुक्यांत कंपनीने विष विरोधी किट्सचे वितरण केले. देऊळगाव राजा येथील काकड हॉस्पिटल आणि लोणार येथील शासकीय रुग्णालयाला वितरित करण्यात आली आहे. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना किट्समुळे त्वरित उपचार मिळाल्याने देऊळगाव राजा येथील सोपान म्हस्के, शकील खान पठाण, प्रभाकर गढलिंग आणि लोणार येथील पार्वती वाघ अशा चौघांचे प्राण वाचले आहेत. अलीकडे या उपक्रमाला गती मिळाल्याचे मोन्सँन्टोच्या मानवाधिकार विभागप्रमुख मेल्ला राधा माधव यांनी सांगितले.