औंध विकास मंडळाच्या वतीने ‘रिव्हर्सिग हॉर्न’ विरुद्ध अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानांर्तगत रिव्हर्स हॉर्न असलेल्या मोटारींची माहिती गोळा करून ती  आरटीओ आणि वाहतूक विभागाला कळविण्यात येणार आहे. मंडळाच्या अध्यक्षा वैशाली पाटकर, गिरीश देशपांडे, डोरोथी मॅसकॅरेन्हस, डी. व्ही. राव, डॉ. धनंजय राऊ याच्या उपस्थितीत या अभियानास सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मोटार वाहन कायदा ११९ (२) अनुसार कोणत्याही वाहनास एका पाठोपाठ आवाज करणारे उपकरण बसवू नये,
कर्कश, मोठा आणि घाबरविणारा आवाज निर्माण करणारी उपकरणे बसविण्यात येऊ नये, असा निमय आहे. यामध्ये रिव्हर्स हॉर्नचा समावेश आहे. या गुन्ह्य़ास पाचशे रुपये दंडाची शिक्षा आहे. औंध विकास मंडळाने याची माहिती देणारे पत्रक काढले असून सर्व सदस्यांना देण्यात आले. या मंडळाचे पंचवीस सदस्यांना रिव्हर्स हॉर्न असलेल्या मोटारी क्रमांक नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे क्रमांक आरटीओ व वाहतूक शाखेला कळविण्यात येणार आहेत.