सांगली-इस्लामपूर मार्गावरील टोल रद्द व्हावा, या मागणीसाठी सुरू असणारे ठिय्या आंदोलन टोल विरोधी कृती समितीने सोमवारी स्थगित केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोल हटविण्याची घोषणा केली असून या बाबतचा लेखी निर्णय लवकरच मिळेल, या आशेवर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीने केली.
कृष्णा नदीवरील आयर्वनि पुलाला पर्याय म्हणून बायपास रोडवर पूल उभा करून अशोका बिल्डकॉनने टोलवसुली सांगलीवाडी नाक्याजवळ सुरू ठेवली होती. शासनाची मुदत संपली असतानाही तांत्रिक बाबीचा आधार घेऊन वाढीव मुदत मागण्यात आली होती. ७ कोटी ५० लाख रूपये खर्च करुन ठेकेदार कंपनीने टोल वसुलीतून १२५ कोटी रूपये वसूल केले होते. त्यामुळे हा टोल हटविण्यासाठी वाहतूकदार संघटनेचे बापूसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टोलविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली होती.  या समितीच्या माध्यमातून गेले २३ दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते.  मदन पाटील युवा मंचचे अध्यक्ष सतिश साखळकर, कृती समितीचे निमंत्रक उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष नितीन िशदे आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी टोल हटविण्यासाठी आंदोलन हाती घेतले होते.