News Flash

अण्णाभाऊ व लोकमान्य टिळक यांचा आदर्श समोर ठेवण्याचे आवाहन

व्याख्यान, चित्र प्रदर्शन, निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी शहर परिसरात विविध सामाजिक संघटना व विद्यालयांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती व लोकमान्य टिळक यांना

| August 6, 2013 08:58 am

व्याख्यान, चित्र प्रदर्शन, निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी शहर परिसरात विविध सामाजिक संघटना व विद्यालयांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ व लोकमान्य टिळक यांचा आदर्श सर्वानी समोर ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सीडीओ मेरी विद्यालय
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यादव आगळे  होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे शिक्षक प्रतिनिधी दिलीप अहिरे, पर्यवेक्षक मुग्धा काळकर, पूजा गायकवाड, मुक्ता सप्रे उपस्थित होते. विद्यालयाच्या दोन्ही सत्रात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
बुध्दसागर मंडळ
अशोकनगर येथे बुध्दसागर बहुउद्देशीय मंडळ व सम्राट अशोक बुध्द विहार समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रा. रोहित गांगुर्डे यांचे व्याख्यान झाले. अण्णाभाऊंचे साहित्य हे दलित, शोषित, श्रमिकांचे दुख मांडून त्यावर उपाय सांगणारे असल्याचे ते त्यांनी सांगितले. बाबुराव बागूल आणि अण्णाभाऊंमुळे मराठी साहित्य अधिक व्यापक बनल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी रवींद्र कांबळे होते. प्रा. संजय अहिरे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक भीमराव पटेकर उपस्थित होते. विठ्ठल दाभाडे यांनी मुंबईची लावणी, कर बदल घालुनि घाव सांगुनी गेले मला भीमराव ही गाणी  सादर केली. कमलाकर मोरे यांनी सूत्रसंचालन केले. डी. बी. गायकवाड यांनी आभार मानले.
विक्रीकर कार्यालय
विक्रीकर विभागाच्या नाशिक कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विक्रीकर सहआयुक्त एस. पी. काले व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन. टी. डाके, अविनाश भामरे उपस्थित होते. डॉ. डाके यांनी अण्णाभाऊ साठे व त्यांची साहित्य निर्मिती, अविनाश भामरे यांनी अण्णाभाऊ साठे व त्यांचे सामाजिक योगदान, अविनाश आहेर यांनी अण्णाभाऊ साठे एक सामाजिक विचार या विषयावर मनोगत व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे यांनी तळागाळातील बहुजन समाजाचा, शोषितांचा आवाज बुलंद करण्याकरिता प्रचंड कष्ट घेतले. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्य निर्मितीची दखल देशपातळीवर घेण्यासारखी आहे असे काळे यांनी सांगितले.

विडी कामगार शाळा
अमृतधाम येथील विडी कामगार वसाहतीतील महापालिकेच्या शाळा क्र. ४५ व ६५ मध्ये जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक  यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका मंगला शिंदे व लता धुमाळ यांनी  प्रतिमांचे पूजन केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लक्ष्मीकांत संत, सुशीला पवार, सुनीता सावंत, सुनीता पवार, संगीता देवरे, पुष्पा निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
सारडा विद्यालय
सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालयातील कार्यक्रमात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना राष्ट्र पुरूषांची माहिती व्हावी, त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहचावे यासाठी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनीच वर्गावर्गातून नियोजन केले होते. अनेक विद्यार्थ्यांनी टिळक व साठे यांची चित्रे स्वत रेखाटली होती. कार्यक्रमासाठी आपल्याच पालकांना अध्यक्ष म्हणून बोलविले. विद्यार्थ्यांनी हिंदी, संस्कृत, इंग्रजी, गुजराथी, मराठी भाषांतून नेत्यांविषयी माहिती दिली. काही विद्यार्थ्यांनी नेत्यांची वेशभूषा परिधान केली होती.
कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ
इंदिरानगर येथील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचे व्याख्यान झाले. रहाळकर यांनी लोकमान्यांचे नाशिकशी असलेले संबंध मांडले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा कर्तृत्वाचा आलेख, त्यांची लेखन संपदा, समाज जागृती या विषयी त्यांनी माहिती दिली. जल संवंर्धनाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघाचे अध्यक्ष अरविंद पाटील, विनायक ठोंबरे, श्रीपाद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कलाकार विचार मंच
कलाकार विचार मंचच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती डॉ. विशाल घोलप, अविनाश आहेर, मुस्ताक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी झाली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर आहेर यांनी मार्गदर्शन केले. अण्णाभाऊ यांना फक्त ४९ वर्षांचे आयुष्य लाभले. परंतु एवढय़ा कमी आयुष्यात त्यांनी साहित्य निर्मिती केली व स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग नोंदविला. डॉ. आंबेडकरांचे विचार तळागाळातील माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. मोहन जगताप यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मीकांत निकम यांनी सूत्रसंचालन केले. पंकज गांगुर्डे यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 8:58 am

Web Title: apeal to take the idol of annabhau and lokmanya tilak
Next Stories
1 धरणांमधील विसर्गात काहिशी कपात
2 नाशिकला खड्डय़ात घालणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे संकेत
3 नाशिकमध्ये ‘फेंडशिप डे’ वर ‘दुनियादारी’ ची छाया
Just Now!
X