पर्यावरण जागृतीसाठी वांद्रे (पश्चिम) भागातील शाळांमध्ये ‘भामला फाऊंडेशन’तर्फे आयोजिण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ‘अपोस्टोलिक कारमल शाळे’ला बुधवारी शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही भेट दिली.
५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिनी’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. यात वांद्रय़ातील ५४ शाळांनी सहभाग नोंदविला. प्राथमिक फेरीसाठी निवडण्यात आलेल्या १५ शाळांमधून तीन शाळा प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यापैकी प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरलेल्या कारमल शाळेला २५ हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला वांद्रय़ातील पर्यावरणविषयक कार्यकर्ते डॅरिल डिमोन्ती आणि शामा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शालेय वयातच पर्यावरणविषयक जाणिवा वाढविल्या पाहिजे, असे त्यांनी या वेळी सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका पर्ल अ‍ॅन, भामला फाऊंडेशनचे आसिफ भामला या वेळी उपस्थित होते. या वेळी भामला फाऊंडेशनच्या वतीने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविणाऱ्या ११ शाळेतील ११ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख रकमेची शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली. कारमल शाळेची शिवानी चव्हाण (८६ टक्के) हिला या वेळी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.