मागासवर्गीयांना आयुष्यात एकदा आरक्षण मिळायला हवे. एकाच व्यक्तीला वारंवार आरक्षण द्यावे की नाही या विषयी पक्षाच्या स्तरावर धोरण ठरत आहे. मात्र, जातनिहाय आरक्षणाऐवजी आम्ही माणूस म्हणून प्रत्येकाला वागवू. आरक्षणाच्या अनुषंगाने पक्षाचे स्वतंत्र असे धोरण असेल, अशी माहिती आम आदमी पार्टीच्या समन्वयक अंजली दमानिया यांनी दिली. औरंगाबाद येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्या म्हणाल्या की,  छावा संघटनेचे कार्यकर्ते आम आदमी पक्षात दाखल झाले तेव्हा जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला. मराठा आरक्षणासाठी पूर्वी ते प्रयत्न करायचे. त्यांना सांगण्यात आले की, आरक्षणाविषयी या पक्षाचे धोरण नव्याने ठरविले जाणार आहे.
जिल्ह्य़ात आम आदमी पक्षाची सदस्यता नोंदणी वाढत असून रविवारी सेवानिवृत्त अधिकारी, विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते पक्षात दाखल झाले. दमानिया यांनी आम आदमी पार्टी अशी लिहिलेली टोपी डोक्यावर घालून कार्यकर्त्यांना प्रवेश दिला. लोकसभा निवडणुकीसाठी कशा पद्धतीने तयारी करायची आणि पक्षाच्या भूमिका कोणत्या, या विषयी मार्गदर्शन करताना त्यांनी राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, भ्रष्टाचार शब्दाचा कंटाळा आला आहे. कधी हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करायचे, तर कधी प्रांता-प्रांतात ते वाढवायचे. ‘द ग्रेट’ असे राज ठाकरे यांना उपहासात्मक विशेषण लावत त्यांनी त्यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेची खिल्ली उडवली. तर जाती-जातीमध्ये विभाजन करून मते मिळविली जातात, असे सांगताना मुंडे यांच्यावर टीका केली. उपहासाने त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्या ‘विद्वान’ मुंडे असे म्हणाल्या. धर्माचे आणि जातीचे आरक्षण आम्हाला करायचे नाही, असे सांगताना त्यांनी पक्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या छावा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा किस्सा सांगितला. पण तो अर्धवटच होता. भाषणानंतर आरक्षणाची भूमिका नक्की काय, असे पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, मागासवर्गीयांना ठरवून दिलेले आरक्षण मागास व्यक्ती म्हणून एकदाच मिळायला हवे. आरक्षण घेऊन एखादा व्यक्ती शिकला, इंजिनीअर झाला, तर त्याच्या मुलाला आरक्षण द्यायचे की नाही, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मात्र, जातनिहाय आरक्षणाला आमचा विरोध असेल. या अनुषंगाने पक्षातही चर्चा सुरू आहे. त्याचे धोरण लवकरच ठरवू.
दिल्लीतील विजयानंतर आम आदमी पक्षावर टीका झाली. राज ठाकरे म्हणाले, आम्ही ‘आप’चे ‘बाप’ आहोत. राष्ट्रवादीचे नवाब मलिक म्हणाले, आम्ही ‘माय’ आहोत. असे जर आई-बाप असतील तर आम्ही ‘अनाथ’ राहिलेले चांगले, असेही दमानिया म्हणाल्या.
 लोकसभा निवडणुकीसाठी चार ते पाच उमेदवारांची प्राथमिक यादी उद्या (सोमवारी) प्रकाशित होईल. ही यादी अंतिम नाही. मात्र, १ मार्चपूर्वी राज्यातील ४८ मतदारसंघातील उमेदवारांची यादी नक्की झालेली असेल. सध्या विविध मतदारसंघातून ६८ अर्ज पुढे आले आहेत. त्यापैकी ४-५ मतदारसंघातील नावे छाननीनंतर प्रकाशित केली जातील. त्यांच्या विरोधात काही आक्षेप असेल तर तोही लक्षात घेतला जाईल आणि त्यानंतर अंतिम यादी प्रकाशित होईल. २० मार्चपर्यंत ‘आप’चा जाहीरनामाही तयार होणार आहे.