मुंबईव्यतिरिक्त महानगर प्रदेश परिसरातील इतर शहरांमधील जवळपास सर्वच परिवहन सेवा प्रवाशांना चांगली सेवा देण्यात असमर्थ ठरल्या असून त्यामुळे एकात्मिक परिवहन सेवा लागू करावी, त्यासाठी प्रसंगी कायदाही करावा, अशी मागणी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक राम पातकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
  मुंबईतील ‘बेस्ट’ची सेवा नावाप्रमाणेच उत्तम आहे, पण महानगर क्षेत्रातील इतर परिवहन सेवा तोळामासाच आहेत. इतर शहरांमध्ये समन्वय साधणे दूर, टीएमटी अथवा केडीएमटी त्या त्या महानगरपालिका क्षेत्रात परिवहन सेवा देण्यात असमर्थ ठरल्या आहेत.
त्यामुळे महानगर प्रदेश क्षेत्रातील ठाण्यापुढील डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना वाहतुकीसाठी उपनगरी रेल्वेव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नाही. त्यातही ठाण्याहून डोंबिवलीला जायचे झाले तरी एकतर नवी मुंबईला वळसा घालून शीळफाटा अथवा भिवंडीमार्गे जावे लागते.
त्याचप्रमाणे कल्याण, बदलापूर, नवी मुंबई, पनवेल येथील प्रवाशांना मीरा-भाइंदर अथवा वसई-विरारला जायचे असल्यास रेल्वेमार्गे दादरला वळसा घालून जावे लागते. यासंदर्भात शासनदरबारी अनेक बैठका झाल्या, परंतु संबंधित महापालिकांनी एकात्मिक परिवहनला प्रतिसाद न दिल्याने दिवसेंदिवस प्रवाशांच्या हालात भर पडत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन तसा कायदा करावा, अशी मागणीही पातकर यांनी केली आहे.
या एकात्मिक परिवहन सेवेत मुंबई रेल्वे विकास संघ, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, महापालिका, नगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना समाविष्ट करून घ्यावे. शहरांना जोडणारे रस्ते, मोनोरेल, मेट्रो, सागरी वाहतूक ट्राम सेवा आणि बससेवेचा त्यात समावेश असावा, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.