वीज दरवाढीचा महावितरणने पुन्हा प्रस्ताव ठेवला असून या विरोधातील संघर्ष हा दीर्घकाल चालणार आहे. सर्व ग्राहक संघटना, जनआक्रोश आणि जनहितवादी संघटनांची एक समन्वय समिती या विरोधात लढण्यासाठी तयार करावी, असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सहकारी संघटनांना आवाहन केले आहे.
महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांची निर्मिती वीज मंडळाच्या त्रिभाजनानंतर झाली. आतापर्यंत दोन्ही कंपन्यांनी १२ वेळा वीज दरवाढ केली. त्यामुळे ग्राहकांना या विरोधात संघर्ष करण्यासाठी तयार राहावे लागते. या कंपन्यांसाठी लोकसेवा ही केवळ तांत्रिक बाब आहे तर महामंडळ हे लोकतांत्रिक संस्था आहे. त्या ग्राहकांविषयी उत्तरदायी असतात.
ग्राहक संघटनांमुळे वारंवार दरवाढ करावी लागत असल्याचे महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे आपली बाजू मांडताना म्हटले. याचा ेविरोधही ग्राहक पंचायतने केला आहे. महावितरणने तीन ते चार वर्षांचा आराखडाही आयोगाला सादर केला आहे. यासर्व बाबी लक्षात घेता महावितरण विरोधात लढण्यासाठी सर्वसमावेशक समितीची गरज आहे.