काही रिपब्लिकन कार्यकर्ते प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांच्या कुटिल आणि स्वार्थी राजकारणाला कंटाळून आंबेडकरी चळवळीच्या बाहेर थांबले होते. त्या सर्वाना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा भक्कम पर्याय मिळाला असून यामुळे संपूर्ण राज्यात सर्वच घटकातील नागरिक सभासद होऊन पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्षाच्या वतीने राबविण्यात येणारे समाज जोडो अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशातील प्रस्थापित समाज व्यवस्थेने गोरगरीब, दलित, आदिवासी, भटके विमुक्त या समूहाला त्यांचे हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवले. त्यामुळे या घटकांची दयनीय अवस्था झाली आहे. गरीब माणसाच्या हाती जोपर्यंत सत्तेची सूत्रे येत नाही, तोपर्यंत त्यांची प्रगती होणे शक्य नाही. ही बाब लक्षात आल्यामुळे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कटारे यांनी सांगितले. मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मिळावी, म्हणून तमाम आंबेडकरी जनतेसोबत सर्वच राजकीय पक्ष संघटनांनी आंदोलने केली व सातत्याने पाठपुरावा केल्याने केंद्र शासनाने स्मारकासाठी जागा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घोषित केला. त्याबद्दल राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने केंद्र शासन व राज्य शासनाच्या अभिनंदाचा ठराव मंजूर केल्याचे कटारे यांनी सांगितले.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला खंबीर भूमिका घेऊन सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याची अवघड जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. अनुसूचित जाती-जमाती कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत पदोन्नती देणारे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे संपूर्ण देशातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी स्वागत केले, परंतु समाजवादी पक्ष व शिवसेनेने त्यास विरोध केला. या दोन्ही पक्षांचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष निषेध करीत असल्याचे कटारे यांनी सांगितले. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपल्या पक्षाचा व्यापक स्वरूपात प्रचार व प्रसार व्हावा, याकरिता संकेतस्थळ सुरू केले असल्याचे कटारे यांनी सांगितले.