मुंबई महापालिकेच्या मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक दलातील मनुष्यबळ कमी पडू लागल्याने भरती प्रक्रियेद्वारे ९५० सुरक्षा रक्षकांची फौज उभी करण्यात आली. मात्र या भरतीमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी ‘न भूतो’ घोटाळे केल्याचे उघड झाले आहे. अर्ज एकाचा आणि शारीरिक चाचणी देतो दुसराच, नाव एकाचे उमेदवार भलताच अशा करामती या चाचणीत झाल्या आहेत. अर्ज केल्यापासून अवघ्या काही दिवसांत उमेदवाराची उंची तब्बल ८ सेमी. ने तर वजन दीड किलोने वाढण्याची किमयासुद्धा या भरतीत झाली आहे. अशा प्रकारे एकाच्या नावावर दुसरा उमेदवार उत्तीर्ण झाल्याने या भरतीतील रक्षकांचा भरवसा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संतापाची बाब म्हणजे मुलुंड पोलिसांनी यासंदर्भातील तक्रारीकडे लक्षच दिलेले नाही.
सुरक्षा रक्षकांची ९५० पदे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यावर त्यासाठी तब्बल ५५ हजार अर्ज आले. छाननीअंती ३५ हजार उमेदवारांना चाचणीसाठी भांडूप कॉम्प्लेक्समध्ये बोलावण्यात आले. निवड झालेल्या ९५० जणांचे प्रशिक्षण १५ डिसेंबर रोजी सुरू झाले. दरम्यान, या चाचणीत सारुक राजेश चंद्रसेन आणि जान्हवी सुर्वे या दोघांनीही अर्ज केले होते. निवडीसाठी चाचणीमध्ये ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक असताना ६५ टक्के गुण मिळूनही या दोघांची निवड झाली नव्हती. त्यामुळे या दोघांनी माहितीच्या अधिकारात काही उमेदवारांचे अर्ज मिळविले. या कागदपत्रांवरून भरतीतील घोटाळा उघडकीस आला.
उमेदवार युवराज शिवाजी घोलप, शरद आदिनाथ पवार, लहू बाजीराव मानमोडे, गणेश तुकाराम मानमोडे यांनी केलेले अर्ज आणि सुरक्षा रक्षक दलातील अधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या त्यांच्या चाचणी अहवालात तफावत आढळून आली आहे. तर काही अर्जावरील छायाचित्रेही वेगवेगळी आहेत. युवराज घोलपने अर्जामध्ये उंची १७० से.मी., वजन ६२ किलो नमूद केले होते. परंतु चाचणी अहवालात त्याची उंची १७८.५ से.मी., तर वजन ६४.३ किलो नोंदण्यात आले आहे. या दोन्हीवर एकाचेच छायाचित्र आहे. शरद आदिनाथराव पवार याने केलेला अर्ज आणि त्याच्या चाचणी अहवालावरील छायाचित्रे वेगवेगळ्या व्यक्तींची आहेत. अर्जामध्ये त्याची उंची १७२ से.मी. व वजन ६० किलो, तर चाचणी अहवालात उंची १७५.५ से.मी. व वजन ६३.८ किलो नमुद करण्यात आले आहे. शरदच्या अर्जावरील स्वाक्षरीमध्येही खाडाखोड झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लहू मानमोडे याची उंची अर्जात १७२ से.मी., तर चाचणी अहवालात १७४.५ से.मी. नोंदविण्यात आली आहे. गणेश मानमोडे याच्या अर्ज आणि चाचणी अहवालात तफावत आहे. ही माहिती हाती आल्यानंतर सारुक आणि जान्हवी यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली. परंतु पोलिसांनी त्याची दखलच घेतलेली नाही.
या भरती प्रक्रियेतून लेखी परीक्षा आणि मुलाखत हद्दपार करण्यात आली असून ९५० सुरक्षा रक्षकांची भरती झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांची प्रतीक्षायादी तयार करण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी पालिकेच्या इतिहासात प्रथमच केला आहे. निवड झालेले १८० उमेदवार नियुक्तीसाठी न आल्याने प्रतीक्षायादीतील १८० जणांची नोकरीत वर्णी लावण्यात आली.
या घोटाळ्याची तक्रार या दोघांनी मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांकडे केली आहे. मात्र अद्याप तरी या दोघांकडूनही त्यांना काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच त्याबाबत काही कारवाईसुद्धा सुरू झालेली नाही.
पालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी, प्रमुख कर्मचारी अधिकारी, चौकशी अधिकारी, रोजगार व समाज कल्याण विभागाचे अधिकारी, पालिका उपायुक्त आदींच्या अनुपस्थितीत ही भरती पार पडली. भ्रष्टाचार होऊ नये म्हणून सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांची आलटूनपालटून तेथे नियुक्ती केली जाते. परंतु यावेळी केवळ १० अधिकाऱ्यांवर हे काम सोपविण्यात आल्याने संशय एकूणच प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्याचा आरोप या दोघांनी केला आहे.
लाखो रुपयांची बिले
भरती प्रक्रिया सुरू असताना उमेदवारांची छायाचित्रे काढण्यासाठी ६८ लाख रुपये, भरतीसाठी मैदानात उभारण्यात आलेल्या शेडसाठी १४ लाख रुपये, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भोजनासाठी १२ लाख रुपये इतका खर्च दाखविण्यात आला आहे.