मध्य भारतातील ‘मेडिकल हब’ म्हणून झपाटय़ाने विकसित होत असलेल्या नागपूर शहरातील डॉक्टरांना एलबीटी लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नागपूर शहरातील हजारो इस्पितळांमध्ये औषधे आणि उपकरणांची विदेशातून आयात केली जात असून यावर एलबीटी लादण्याचा महापालिकेचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सद्यस्थितीत इस्पितळांना व्हॅट लागू असून व्हॅट भरणाऱ्या इस्पितळांची एलबीटी अंतर्गत नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असून त्यांना महापालिकेतर्फे एलबीटी क्रमांकही दिला जाणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे एलबीटी लागू होण्यापूर्वी इस्पितळे जकात नाक्यांवर जकात कर चुकता करीत असत. आता जकात कालबाह्य़ झाली असून कंपन्या औषधे आणि उपकरणांचा इस्पितळांना थेट पुरवठा करीत आहेत. त्यावर आता एलबीटी भरावा लागणार आहे. एखाद्या इस्पितळाने एलबीटी चुकविल्याचे लक्षात आल्यास संबंधित इस्पितळाची चौकशी केली जाईल. बहुतांश इस्पितळांमधील उपकरणे विदेशातून आयात करण्यात येतात. त्यामुळे एलबीटी लागू केल्यास महापालिकेला चांगले उत्पन्न मिळू शकेल, असा आडाखा बांधण्यात आला आहे.
शहरातील अनेक डॉक्टरांना एलबीटी अंतर्गत नोंदणी करण्याच्या सूचना महापालिकेने पत्राद्वारे दिल्या असून सहायक महापालिका आयुक्त (एलबीटी) महेश धामेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बडी इस्पितळे आणि नामांकित डॉक्टरांकडे येणारी औषधे आणि उपकरणे पाहता त्यावर एलबीटी लावणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. इस्पितळांनीच कर दिला पाहिजे अशी अनिवार्यता नाही, कंपनीतून पुरविण्यात येणाऱ्या मालावर एलबीटी आकारला जाऊ शकतो. रुग्णांची तपासणी करणारे आणि प्रीस्क्रिप्शन देणाऱ्या जनरल फिजिशियन्सना एलबीटी अंतर्गत नोंदणीची आवश्यकता नाही, असेही धामेचा यांनी स्पष्ट केले आहे.