अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांना राजकीय पाठबळ देण्याचे संकेत देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातचा राखला! अर्थात, कदम यांच्याही तक्रारी येत असतात. पण कारभार नीट असेल तर घाबरण्याचे कारण काय? आरोप होतच असतात. पण त्यासाठी कारभारही चांगला लागतो, असा सल्लाही पवार यांनी दिला. निधी देऊ. पण कारभार नीट करा, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कर्जवितरण कार्यक्रमात पवार बोलत होते. इंदिरा आवास योजनेतून उभारण्यात येणाऱ्या घरकुलांच्या निधीत वाढ करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पत्रकारांशी बोलताना राज्यात अत्यावश्यक सेवेत लवकरच एक हजार रुग्णवाहिका उपलब्ध होणार असून, तातडीने रक्त मिळण्याच्या अनुषंगानेही लवकरच योजना सुरू केली जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली. महामंडळाच्या वतीने राज्यातील ३ हजार लाभार्थीना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे कर्जवितरण संत तुकाराम नाटय़मंदिरात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महामंडळाचे अध्यक्ष कदम, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांची उपस्थिती होती.
ढोबळे यांनी या वेळी दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेला गती द्यावी, तसेच इंदिरा आवास योजनेच्या घरकुलाच्या निधीत वाढ करावी, अशी मागणी केली. ढोबळे यांची मागणी योग्य असल्याचे सांगत घरकुलाच्या निधीत वाढ केली जाईल, असे पवार यांनी जाहीर केले. अण्णा भाऊ साठे महामंडळातील कर्जवसुलीचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. ते वाढायला हवे. काही दलालांनी या योजना लाटल्या आहेत. मात्र, या पुढे असे होऊ दिले जाणार नाही. अध्यक्ष कदम ‘पारदर्शक’ कारभार करतील, असे त्यांनी सांगितले. कदम यांच्याही काही तक्रारी होत्या. त्या येत असतात. पण कारभार पारदर्शक असेल तर घाबरण्याचे कारण नसते. आरोप होतच राहतात, असेही पवार यांनी आवर्जून नमूद केले.
महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत ३१३ कोटींचे कर्जवितरण केले. मात्र, ९० टक्के वितरण बनावटच होते. काही दलालांनी महामंडळाचा कारभार ताब्यात घेतला होता. आता तो स्वच्छ करण्याची प्रक्रिया हाती घेतली असल्याचे अध्यक्ष कदम यांनी सांगितले. कदम यांच्यावर काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला होता. त्यांना पोलीस कोठडीही दिली होती. केवळ दलालांनी हा प्रकार घडविल्याचा खुलासा या वेळी करण्यात आला. राज्याच्या गृह विभागाने जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष्य केल्याचा आरोपही कदम यांनी पवार यांच्यासमोर केला. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, सर्वसामान्यांपर्यंत निधी पोहोचावा म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजासाठी विशेषत्वाने योजना द्या, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले असल्याने या महामंडळातील भागभांडवल ३०० कोटींनी वाढविले. अध्यक्ष कदम यांनी पारदर्शक कारभार करावा.
सामाजिक कार्यकर्ते एकनाथ आव्हाड यांच्यावरही नाव न घेता ढोबळे यांनी टीका केली. ते कदम यांच्या कारभारात अतिरिक्त लक्ष घालतात, असे ढोबळे म्हणाले. कदम यांचे हात मजबूत करा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. नाव न घेता ‘पांढरी दाढी’ वाढवून परदेशातून पैसा आणणे म्हणजेच समाजकार्य नाही, असा टोलाही ढोबळे यांनी लगावला. बीडमधील एकनाथ आव्हाड यांच्याकडे त्यांना लक्ष वेधायचे होते.
‘टेक्सटाईल पार्कसाठी पुढाकार घ्यावा’
वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाल्यानंतर विविध ठिकाणी टेक्सटाईल पार्कला मंजुरी देण्यात आली. या उद्योगामुळे अनेकांना रोजगार मिळू शकतो. त्यामुळे औरंगाबादकरांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. पैठण येथील संतपीठाच्या उभारणीला चालना देण्यात येणार असून पैठण-आपेगाव प्राधिकरण विकासासाठी विशेषत्वाने प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोरअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे दर वाढवून देण्याचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले. बिडकीन येथे त्यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात इमारतीचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.