राज्य सरकारने २००१ च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखडय़ाचे फेर नियोजन केले असून  जिल्ह्य़ात दहा आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय कळवण तालुक्यातील दळवट येथे नव्याने ग्रामीण रुग्णालय आणि त्र्यंबकेश्वर, येवला येथील ग्रामीण रुग्णालयात सध्याच्या एकूण ६० ऐवजी ९० खाटांची वाढ करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्य़ातील रुग्णांना स्थानिक पातळीवर उत्कृष्ठ आरोग्य सेवा मिळणार असून त्यामुळे त्यांची आर्थिक व श्रमात बचत होणार आहे. या सर्व ठिकाणी तांत्रिक मनुष्यबळ शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा तयार करताना विचारात घेतलेले निकष काहीअंशी यासाठी शिथील करण्यात आले आहेत. राज्य सासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नऊ जून रोजी संबंधित शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळंजे, दिंडोरी तालुक्यातील जऊळके, निफाड तालुक्यातील आहेरगाव, मालेगाव तालुक्यातील मालधे, येवला तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक, देवठाण, निमगावमढ तर, सिन्नर तालुक्यातील गुळवंच, नळवाडी, मानोरी याठिकाणी नवीन आरोग्य उपकेंद्र सुरू होणार आहे.
जिल्ह्य़ातील कळवण तालुक्यात दळवट या ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये तर, येवला येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेस या निर्णयामुळे बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. दुर्गम आदिवासी भागातील ग्रामीण रूग्णालयांमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याने नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची संख्या कमी होऊ शकेल. त्यामुळे नाशिकपर्यंत येण्यासाठी रूग्णांना लागणारा वेळ व पैशांची बचत होणार आहे. यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, आ. जयंत जाधव यांनी वारंवार पाठपुरावा केला.
शासनाने रूग्णालयांमध्ये सुधारणा तसेच नवीन उपकेंद्रे सुरू करण्याचा निर्णय योग्य असला तरी या रूग्णालयांमध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षित आणि सौजन्यशील असतील याकडेही शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा रूग्णालयांमध्ये रूग्णांना येणारे अनुभवोरसे चांगले नसल्याच्या तक्रारी आहेत. नाशिक येथील जिल्हा रूग्णालयातही मध्यरात्री येणाऱ्या रूग्णांची प्रचंड हेळसांड होण्याचे प्रकार वारंवार घडतात. रूग्णांवर वेळेवर उपचार न झाल्यामुळे रूग्ण दगावण्याचेही प्रकार घडतात. ही परिस्थिती सुधारल्यास शासकीय आरोग्य व्यवस्थेविषयी जनतेच्या मनात विश्वास निर्माण होऊ शकेल. त्यासाठीही पालकमंत्री आणि आ. जाधव यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.