शहरातील रहदारीला मदत तर दूरच राहिली, वाहतूक पोलिसांचा नागरिकांना त्रासच अधिक होऊ लागला आहे. विशेषत: व्यापारीवर्गात संतापाची भावना निर्माण झाली आहे.  
मेन रोडवर व्यापा-यांच्या दुकानामधून माल भरणाऱ्या तीनचाकी व टेम्पो रस्त्यावर उभा राहिला म्हणून कर्जतचे वाहतूक पोलीस ती वाहने पकडून कारवाई करीत आहेत. गुरुवारी एक बाहेरगावचा टेम्पो होता व चालक पत्ता विचारण्यासाठी खाली उतरला असता मालाने भरलेला हा टेम्पो पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आला, त्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. अशा कारवायांमुळे व्यापारीवर्गात संतापाचे वातावरण आहे. हे पोलीसही जिल्हा पोलीस अधीक्षकांचा आदेश असे ठासून सांगत व्यापाऱ्यांसह मालवाहू वाहनांच्या चालकांनाही त्रास देत आहेत.
या प्रकरणी शिवसेनेच्या माल वाहतूक मोटारचालक संघटनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव यांनी संबंधितांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले आहे. यात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचाही इशारा त्यांनी दिला आहे. दुकानातून मालाची चढउतार करणाऱ्या वाहनांवर कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक राख यांनी तशा सूचना संबंधितांना दिल्याचे सांगितले.