News Flash

तलाठय़ांचा कारभार मनमानी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रकार

तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात महसूल प्रशासनाचा तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर अंकुश नसल्याने मोठय़ा प्रमाणावर तलाठी त्यांना नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपलब्ध राहत नसल्याचे दिसून

| August 2, 2014 01:01 am

तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात महसूल प्रशासनाचा तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर अंकुश नसल्याने मोठय़ा प्रमाणावर तलाठी त्यांना नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपलब्ध राहत नसल्याचे दिसून येत असून तलाठी भेटत नसल्याने शेतकरी आणि विद्यार्थी यांची कामे रखडण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत नायब तहसीलदाराकडे अनेकदा तक्रारी करून दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने आपत्कालीन स्थितीत गावांची माहिती महसूल प्रशासनामार्फत तातडीने पोहचविण्यासाठी सर्व तलाठय़ांनी नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपस्थित राहण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. परंतु असे असतानाही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र वेगळीच परिस्थिती दिसून येते. महाविद्यालयीन प्रवेश तसेच विविध सवलतीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तत्काळ मिळणे विद्यार्थ्यांकरिता गरजेचे असते. तर, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी सात-बारा आणि खाते उतारा आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध व्हावीत म्हणून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना महसूल विभागाकडून देण्यात आल्या आहेत. परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही अपवाद वगळता या सूचनांकडे तलाठय़ांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. नेमून दिलेल्या गावांना तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकरी व विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे.  इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील महिला तलाठी पंधरा दिवसापासून गैरहजर असल्याने या गावातील शेतकरी पीक विमा योजनेचे चलन भरण्यापासून आणि त्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडूनही दखल घेण्यात आलेली नाही.
दुर्गम व डोंगराळ भागात आणि शहरापासून दूरवर असलेल्या गावांमध्ये तलाठी उपस्थित राहात नसल्याची समस्या अधिक प्रमाणावर दिसून येते. अशा गावांकडे वरीष्ठ अधिकारी अचानक भेटीला येण्याची शक्यता कमी असल्याने तलाठी बिनधास्त असतात. अशा गावांमध्ये कार्यरत तलाठी आठवडय़ातून एखाद्या दिवशीच ग्रामस्थांना भेटत असल्याने आणि तलाठी आल्याची माहिती सर्वाना मिळत नसल्याने ग्रामस्थ संबंधित कार्यालयात गेल्यावर तलाठी परत बाहेर गेल्याचे निरोप त्यांना ऐकावे लागतात. तलाठय़ांना गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना आठवडय़ातून अनेक वेळा घिरटय़ा घालाव्या लागतात. वरीष्ठांनी दुर्गम भागातही अचानक भेट देऊन तलाठी कार्यस्थळी आहेत कि नाही याची तपासणी केल्यास तलाठय़ांचे अनुपस्थित राहण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे विद्यार्थी व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:01 am

Web Title: arbitrary work of talathi in nashik
टॅग : Loksatta,Talathi
Next Stories
1 दऱ्याखोऱ्यातील गावांचे सर्वेक्षण
2 चोवीस तासांत ६६३ मि.मी.पाऊस
3 शाही मार्गाचे अंशत: विस्तारीकरण करण्याचा निर्णय
Just Now!
X