इचलकरंजीतील फेरी विक्रेत्यांच्या प्रश्नावरून गुरुवारी इचलकरंजी नगरपालिकेत विरोधक व सत्तारूढ गटात वादावादी झाली. तर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात फेरी विक्रेत्यांनी गोंधळ घातल्याने मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना गोंधळावर ताबा घालण्यास सुनावले. सुमारे चार तास वादावादीचे चित्र कायम असूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने छोटे व्यापारी व फेरी विक्रेत्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.
इचलकरंजीतील छोटे व्यापारी व फेरी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीवरून सत्तारूढ व विरोधकांमध्ये मतभेद आहेत. याप्रश्नी काल आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्याधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेवेळी मार्ग निघू शकला नव्हता.
गुरुवारी विरोधी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांच्यासह आंदोलकांनी देवेंद्रसिंग यांची भेट घेतली. मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर निर्णय घेत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यावरून मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात गोंधळाला सुरुवात झाली. संतापलेले मुख्याधिकारी देवेंद्रसिंग यांनी पोलिसांना शांतता राखण्याचे व आंदोलकांना रोखण्यासंदर्भात कडक शब्दांत सुनावले.    
यानंतर आंदोलक नगराध्यक्षांच्या दालनात गेले. अजित जावळे, धोंडिराम जावळे यांनी सत्ताधारी प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत असल्याचा आरोप केला. त्यावर सत्तारूढ गटाचे पक्षप्रतोद सुनील पाटील, रवि रजपुते, रवि माने, शशांक बावचकर हे संतप्त झाले. त्यातून आरोप-प्रत्यारोप वाढू लागला. बराच काळ ही वादावादी सुरूच राहिली. त्यावर फेरीवाले समितीच्या सदस्यांनी राजीनामे देऊन काँग्रेस, राष्ट्रवादी व शहर विकास आघाडीचे प्रत्येकी चार सदस्य नव्याने निवडण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्यावरही निर्णय न झाल्याने बेमुदत उपोषण सुरूच राहिले. तिसऱ्या दिवशी मार्ग निघण्याच्या अपेक्षेने फेरी विक्रेते मोठय़ा संख्येने नगरपालिकेत जमले होते. त्यांचा भ्रमनिरास झाला. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त नगरपालिकेत तैनात करण्यात आला होता.