पनवेलचा खरा स्थानिक भूमिपुत्र कोण, स्थानिकाची नेमकी व्याख्या काय, अशा प्रश्नामुळे पनवेलचे रिक्षाचालक व इकोव्हॅनचालक आपसात भिडले आहेत. आपल्या सोयीनुसार चुकीची हद्द स्थानिकांनी आखल्याने हद्दीचे वाद येथे रंगलेत, मात्र या वादाचा फटका याच स्थानिकांच्या भावबंधकीला सहन करून आपले पोट भरावे लागत आहे. सध्या पनवेलमध्ये स्थानिक कोण, या सामाजिक प्रश्नामुळे पनवेलच्या इतर गावांतील स्थानिकांना हम तो ठहरे परदेशी बोलण्याची वेळ आली आहे. नुकतेच झालेले इकोव्हॅनचालकांवरील हल्ले याच वादाचे पडसाद आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी मनसेने केली आहे.
माझ्या गावाजवळच्या सिडको वसाहतीवर माझीच मक्तेदारी, या वृत्तीने हा अलिखित पायंडा पनवेल परिसरात पडल्याने तालुक्यातील इतर गावांतील ग्रामस्थ अशा स्थानिकांसाठी उपरे ठरले आहेत.
पनवेल तालुक्यातील इकोव्हॅन व तीन आसनी रिक्षाचालकांच्या वादाच्या ठिणगीमुळे हा प्रश्न पेटला आहे. शीव-पनवेल मार्गावर कामोठे, कळंबोली, कोपरा, खारघर, बेलापूर या पल्ल्यावर इकोव्हॅनचालकांनी भाडे भरू नये असा फतवा वाहतूक पोलिसांसोबत तीन आसनी रिक्षाचालकांनी काढला आहे. पोलिसांच्या कारवाईला चुकवायचे की तीन आसनी रिक्षाचालकांच्या माराला अशी वेळ या इकोव्हॅनचालकांवर आली आहे. सध्या दीडशेहून अधिक इकोव्हॅन या पनवेल तालुक्यातील इतर ग्रामस्थांच्या मालकीच्या आहेत. १० किलोमीटर असणाऱ्या गावातील तरुणालाही कामोठे येथील एमजीएम नाक्यावरील तीन आसनी रिक्षाचालक व्यवसाय करण्यापासून रोखत आहेत. या वादाचा फटका दीपक घरत या तरुणाला सहन करावा लागला. घरत हे धानसर गावातील ग्रामस्थ आहेत. अशीच वेळ अनेकांवर आली आहे. तळोजा येथील ग्रामस्थांना पोट भरण्यासाठी खारघर येथे व्यवसाय करायला बंदी केली आहे. घोटकॅम्प येथील अनेकांचे इकोव्हॅनवर पोट आहे. त्यांच्यावरही इकोव्हॅन बंद करून इतर व्यवसाय शोधण्याची वेळ आल्याचे अनिल कदम यांनी सांगितले. तीन आसनी रिक्षाचालकांची अजूनही बोलीभाडे पद्धत सुरू आहे. हे रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारत नसल्याने प्रवाशांना इकोव्हॅनकडे वळावे लागते. स्वस्त प्रवासासाठी प्रवासी इकोव्हॅनकडे आकर्षित होतात.
कळंबोली,पनवेल व खांदा कॉलनी येथे इतर जिल्ह्य़ातून पनवेलमध्ये तीन आसनी रिक्षाचालकांना खांदेश्वर, मानसरोवर, खारघर रेल्वेस्थानकात व्यवसाय करायला बंदी आहे. हासुद्धा स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांचा अलिखित फतवाच आहे. त्यामुळे हे परदेशी रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. आम्ही २० वर्षे यांच्यासोबत एकत्र राहूनही आम्ही या स्थानिकांना परदेशी असल्याची खंत या परजिल्ह्य़ातील रिक्षाचालकांची आहे. विशेष म्हणजे कामोठे येथे राहात असलेल्या रिक्षाचालकाला निव्वळ तो बाहेरगावचा असल्याने कामोठे येथे व्यवसाय करण्याचा अधिकारी स्थानिकांच्या कायद्यात दिलेला नाही.  
स्थानिक रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभाराविरोधात मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने संतोष गवस यांनी पनवेलचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कामोठे येथे बससेवा सुरू करत नाही, तसेच रिक्षाचालक इतरांना व्यवसाय करू देत नाहीत असे या तक्रारीत म्हटले आहे.
मीटर डाऊन न केल्यास तक्रार करा
गेल्या १७ नोव्हेंबरपासून पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागाने मीटर सक्तीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. काही प्रमाणात या कारवाईला यश आले आहे. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाशिवाय हे शक्य नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने तीन आसनी रिक्षाचालकांनी मीटर डाऊन न केल्यास ९००४६७०१४६ या हेल्पलाइन क्रमांकावर एसएमएस करून तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. या एसएमएसमध्ये तक्रारदाराचे नाव, पत्ता, तारीख, रिक्षा क्रमांक व तक्रारीचे स्वरूप लिहावे.