22 September 2020

News Flash

मध्यप्रदेश व बिहारमधून अमरावतीत शस्त्र तस्करीचे केंद्र

काही दिवसांपूर्वी येथील पॅराडाईज कॉलनीत युवकाने देशी कट्टय़ातून गोळीबार केल्याची घटना चर्चेत असतानाच शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या

| January 29, 2014 09:31 am

काही दिवसांपूर्वी येथील पॅराडाईज कॉलनीत युवकाने देशी कट्टय़ातून गोळीबार केल्याची घटना चर्चेत असतानाच शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या (व्हिएमव्ही) परिसरात देशी कट्टा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याने अमरावतीत अवैध शस्त्रांची तस्करी वाढल्याचे स्पष्ट होते. गेल्याच महिन्यात एका अपघातामुळे शस्त्रांची तस्करी करणारा आरोपी बडनेराजवळ पोलिसांच्या हाती लागला होता. सातपुडय़ाच्या पायथ्याशी अंबाबरवा अभयारण्य आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील अवैध शस्त्रास्त्र निर्मितीच्या अड्डय़ांमधून, तसेच बिहारमधून ही शस्त्रे अमरावतीत आणली जात असून शहरात देशी कट्टय़ाच्या तस्करीचे केंद्र बनले आहे.
गेल्या शुक्रवारी विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ गुन्हे शाखेच्या पथकाने इम्रान मिर्झा बेग (२५, रा. हबीबनगर) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून एक देशीकट्टा पोलिसांना मिळाला. पोलिसांनी नंतर त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा दुसरा देशीकट्टा मिळाला. तो आरोपीने मातीत गाडून ठेवला होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने तळेगाव येथून हे देशीकट्टे आणल्याचे सांगितले. केवळ ३ हजार रुपयांमध्ये खरेदी केलेले हे देशीकट्टे २० हजार रुपयांमध्ये विकण्याच्या प्रयत्नात तो होता. विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या परिसरात ग्राहकाला देशीकट्टा विकण्याच्या प्रयत्नात आरोपी इम्रान शेख होता, पण त्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. इम्रान शेख हातमजुरीचे काम करतो. त्याचे वडील सायकलरिक्षा चालवतात. ज्यावेळी ही कारवाई झाली, तेव्हा संस्थेत स्नेहसंमेलन सुरू होते आणि आरोपी स्नेहसंमेलनातील नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी आला होता. हा देशीकट्टा तो एखाद्या विद्यार्थ्यांला विकणार होता का, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही, पण अमरावती शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध शस्त्रांच्या तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस येत असताना पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
गेल्या महिन्यात मोटरसायकल अपघातात जखमी झालेल्या अमरसिंह बावरी या आरोपीकडून चार देशीकट्टय़ांसह आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या शस्त्र निर्मितीच्या अड्डय़ांमधून त्याने ही शस्त्रे आणली असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना या अड्डय़ांपर्यंत पोहोचता आलेले नाही. दुसरीकडे, बिहारमधूनही अमरावतीत शस्त्रे आणली जात आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नांदगावपेठ येथील अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ शेख इरफान शेख हारून (२५, रा. हबीबनगर) या आरोपीजवळून देशीकट्टा जप्त करण्यात आला होता. त्याच्या विरोधात आधीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. हा देशीकट्टा त्याने बिहारमधून आणल्याचे सांगितले होते, तर ऑगस्टमध्ये जळगाव जामोद पोलिसांनी अमरावती-परतवाडामार्गे बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसमधून सहा देशीकट्टे जप्त केले होते. ही शस्त्रे अंबाबरवा अभयारण्य आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील अड्डय़ांमध्ये बनवली गेली होती. २००५ मध्ये बुलढाणा जिल्ह्य़ाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी धडक कारवाई करून हे अड्डे उध्वस्त केले होते. अमरावतीत अलीकडच्या काळात गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष कमी झाल्याने पोलीस प्रशासन समाधान मानत असले, तरी ज्या पद्धतीने शस्त्रास्त्रांची आणि विशेषत: अग्निशस्त्रांची तस्करी वाढू लागली ते धोक्याचे संकेत मानले जात आहेत. या तस्करांचे जाळे हुडकून काढण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2014 9:31 am

Web Title: arm smuggling from mp and bihar
टॅग Smuggling
Next Stories
1 महसूल विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम
2 ‘महाराष्ट्र गुणिजन’ पुरस्काराने अजय भाकरे सन्मानित
3 काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत वडेट्टीवारांची बाजी
Just Now!
X