काल रविवारी धम्मचक्र प्रवर्तनदिन वर्धापनदिनाच्या मिरवणुकीत झालेल्या भांडणात केदार सिद्राम धुळे (वय १९) या तरुणावर चौघाजणांनी शस्त्राने वार करून त्यास गंभीर जखमी केले. भागवत चित्रपटगृहाजवळ रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
केदार धुळे (रा. मराठा वस्ती, भवानी पेठ) याने यासंदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे मित्रांसह येत असताना भागवत चित्रपटगृहाजवळ धम्मचक्र प्रवर्तन वर्धापनदिनाची मिरवणूक चालली होती. या मिरवणुकीत लेझीमचा डाव रंगला होता. त्या वेळी धुळे याने लेझीम खेळाडूंना बाजूला सरका असे म्हटल्याने मिरवणुकीतील चौघाजणांनी चिडून धुळे यास, तू आम्हाला शिकवणारा कोण, असे म्हणत त्याला बेदम मारहाण केली. या वेळी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात त्याच्या मानेवर गंभीर जखम झाली. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जितू नावाच्या युवकासह गोटय़ा उडाणशिवे व डी. के. ग्रुप मंडळातील अन्य दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
हप्त्यासाठी दाम्पत्याला मारहाण
शहरातील मड्डी वस्ती येथे नियमित हप्ता देत नाही म्हणून गुंडांनी विनोद भारत ढावरे व त्याच्या पत्नीला लोखंडी सळई व काठय़ांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी बबलू बनसोडे व त्याच्या पत्नीसह सोमनाथ भालेराव, सुग्रीव यांची नावे संशयित आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. या हल्लेखो-यांनी विनोद ढावरे यास तू चौकात थांबतोस आणि आम्हाला हप्ता देत नाहीस म्हणून जाब विचारत त्याच्या घरात घुसून हल्ला केला. जोडभावी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.