News Flash

माजी महापौर जाधव गुरूजींच्या घरावर सशस्त्र दरोडा; १९ लाख लुटले

सोलापूरचे माजी महापौर दलित मित्र भीमराव जाधव गुरूजी यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घालून जाधव कुटुंबीयांना मारहाण करीत ४० तोळे सोने, रिल्व्हॉल्व्हर व रोख रक्कम

| December 6, 2013 02:20 am

सोलापूरचे माजी महापौर दलित मित्र भीमराव जाधव गुरूजी यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घालून जाधव कुटुंबीयांना मारहाण करीत ४० तोळे सोने, रिल्व्हॉल्व्हर व रोख रक्कम असा सुमारे १९ लाखांचा ऐवज लुटून नेला. विजापूर रस्त्याजवळील नवीन आरटीओ कार्यालयालगत नागू नारायणवाडी येथे गुरूवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या या गुन्ह्य़ाची नोंद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात झाली आहे.
यासंदर्भात दलित मित्र भीमराव जाधव यांचे पुत्र तथा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भारत जाधव (वय ६२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्य़ात २० ते २५ वर्षे वयोगटातील पाच सशस्त्र दरोडेखोरांचा सहभाग होता. नवीन आरटीओ कार्यालयाच्या पुढे नागू नारायणवाडी परिसरात जाधव यांच्या मालकीचे सुभद्राई मंगल कार्यालय असून त्यालगतच जाधव कुटुंबीयांचा बंगला आहे. पहाटे अडीचच्या सुमारास जाधव कुटुंबीय झोपेत असताना बंगल्याच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. या वेळी ९२ वर्षांचे माजी महापौर,दलितमित्र भीमराव जाधव गुरूजी हे बंगल्यातील आपल्या स्वतंत्र खोलीत झोपले होते. दरोडेखोरांनी बंगल्यात घुसल्यानंतर भारत जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना तलवार व काठीने मारहाण करून दहशत निर्माण केली. दरोडेखोरांनी बंगल्यातील कपाटाच्या चाव्या मागितल्या. प्रतिकार कराल तर संपूर्ण कुटुंबीयांना खलास करण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीने गाळण उडालेल्या जाधव कुटुंबीयांनी स्वत:च्या अंगावरील सोन्याचे दागिने व कपाटाच्या चाव्या निमूटपणे दरोडेखोरांच्या हवाली केल्या. नंतर दरोडेखोरांनी जाधव कुटुंबीयांना एका खोलीत डांबले व बाहेरून खोलीला कडी घातली. त्याच सुमारास गोंधळामुळे झोपेतून जागे झालेले भीमराव जाधव गुरूजी यांनी पुत्र भारत व इतरांना पुकारले. परंतु दरोडेखोरांनी त्यांचीही खोली बाहेरून बंद केली होती. दरोडेखोरांच्या भीतीमुळे स्वत: जाधव गुरूजी यांना शांत बसावे लागले.
दरोडेखोरांनी बंगल्यातील सर्व खोल्यांमध्ये सहजपणे फिरून कपाटांतील ४० तोळे सोन्याचे दागिने काढले. चार लाख ६८ हजारांची रोकड होती. तसेच भारतीय बनावटीचे ३२ बोअरचे रिव्हॉल्व्हरही होते. तेही दरोडेखोरांच्या हातात पडले. सोन्याच्या दागिन्यांमध्ये ६५ ग्रॅमची साखळी, ५० ग्रॅमचे ब्रेसलेट, ५० ग्रॅमचा पोहे हार, ५० ग्रॅमच्या पाटल्या, बांगडय़ा, मणी मंगळसूत्र, अंगठय़ा, गंठण, कंगन, लक्ष्मीहार, कर्णफुले यांचा समावेश होता. दरोडेखोरांनी पॅन्ट व काळे टी-शर्ट, स्वेटर व तोंडावर काळे कापड घातलेले होते.
या दरोडेखोरांनी माहिती पोलिसांना कळविण्यात आली असता पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जाधव यांच्या बंगल्यात येऊन दरोडय़ाच्या पध्दतीचे निरीक्षण नोंदविले. सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत गायकवाड हे या गुन्ह्य़ाचा तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2013 2:20 am

Web Title: armed robbery at home of former mayor jadhav stolen 19 lakh
टॅग : Solapur
Next Stories
1 ‘आयआरबी’च्या रस्त्यांच्या कामाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली का?
2 ‘एफआरपी’चा भंग करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी
3 अस्तित्वात नसलेल्या भूखंडाची विक्री
Just Now!
X