दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे भारताचे पहिले लष्कर प्रमुख व फिल्ड मार्शल करियप्पा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या करण्यात येणाऱ्या लष्कर दिनाच्या सोहळ्यामध्ये शौर्य गाजविणाऱ्या जवानांना गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यास लेफ्टनंट अशोक सिंह, जनरल ऑफिसर इन चिफ आणि सदर्न कमांड उपस्थित राहणार आहेत.
भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रुचा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे. युद्धजन्य परिस्थिती नसतानाही हिमालयातील गोठविणाऱ्या थंडीत, थरच्या उष्ण वाळवंटामध्ये आणि ईशान्येकडील दाट जंगल परिसरामध्ये डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस जवान देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. मध्यंतरी काश्मीर आणि उत्तराखंड आलेल्या पुरात अडकलेल्यांची मदत करण्यासाठी भारतीय लष्करातील जवानांनी धाव घेतली होती.
जवानांच्या अशा कार्याला सलाम करण्यासाठी १९४९ पासून दरवर्षी १५ जानेवारीला ‘लष्कर दिन’ आयोजित केला जातो. गतवर्षी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चौदा युनिट्सचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे. भारतीय सैन्य आणि नागरी संस्थातील अनेक मान्यवर अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुंबईकरांनाही हा सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.