आर्णी तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आली असली तरी संततधार पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर मात्र दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यात अरुणावती, पैनगंगा व अडाण, अशा तीन नद्यांचा समावेश असल्याने या नदी व नाल्या काठच्या शेतकऱ्यांना पुराचा मोठा फटका बसला असून त्याचे सव्‍‌र्हे करून मदतीचा हात मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसाच्या पावसामुळे विदर्भात चौघांचा बळी गेला आहे. यात नागपूर जिल्ह्य़ातील भिवापुरात दोन, नागपुरात १ मुलगा, तर चंद्रपूर जिल्ह्य़ात माजरीजवळ वेकोलीचा एक कर्मचारी त्याच्या कारसह पुरात वाहून गेल्याने, तर भद्रावतीत घराची भिंत कासळल्याने एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे.
अति पावसामुळे शेकडो हेक्टर शेतामधील पिके खरडल्या गेली असून हजारो हेक्टरातील पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सव्‍‌र्हे केव्हा होईल व मदतीचा हात केव्हा मिळेल, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. तहसीलदार नरेंद्र दुबे यांच्याशी संपर्क केला असता प्रथम आर्णी येथील व नंतर तालुक्यातील विस्तृत आराखडा बनवून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
आर्णी येथील पूर ओसरला असले तरी ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले याबाबत आठ पथके बनविण्यात आली असून ही पथके नुकसानीची माहिती घेणार आहेत. १५ जूननंतर केवळ १० दिवसातच आर्णीकरांना पुराचा मोठा तडाखा बसला. आता त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. नदीकाठच्या व नाल्याकाठच्या सुमारे ७०० कुटुंबांना मोठी झळ बसली आहे.
शासन स्तरावरून पुनर्वसनाचा प्रश्न थंडबस्त्यात असून हा प्रश्न तात्काळ निकालात काढण्याची गरज असताना प्रशासन व लोकप्रतिनिधी या संदर्भात उदासीन आहेत. पूरग्रस्तांना तात्काळ मदतीचा हात मिळावा, अशी मागणी असली तरी शासनाची नियमावलीवरच  बरेच काही निर्भर आहे. पूरग्रस्त तसेच शेतकरी १० दिवसाच्या अंतराने आलेल्या महापुरामुळे धास्तावले आहेत.
तालुक्यातील कोसदणी, महांळुगी, उमरी आदी गावात व नाल्याकाठी असलेल्या गावांना मोठा फटका बसलेला आहे. पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आर्णी तहसील प्रशासनाला दिले आहेत.

विदर्भात पावसामुळे ५ जणांचा मृत्यू
गेल्या तीन दिवसाच्या पावसामुळे विदर्भात चौघांचा बळी गेला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्य़ातील शिरना नदीला पूर आल्याने माजरी गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. येथीलच वेकोलि कर्मचारी राजू मुदगल (४५) चार चाकीने घरी जात असतांना कारसह तो वाहून गेला. यात त्याचा मृत्यू झाला, तर शेकडो घरांची पडझड झाली. दरम्यान, गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने व २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काल मुसळधार पावसामुळे चिमूर व वरोरा शहरातील १५० घरात पुराचे पाणी शिरले होते. मात्र, आज उघडीप दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. मंगळवारी भद्रावती येथे किल्ला वॉर्डात घर कोसळल्याने सोनाबाई बापूराव ठेंगणे या ७० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. तसेच नागपूर जिल्ह्य़ात भिवापूर आणि उमरेड येथे मंगळवारी जोरदार पाऊस पडला. भिवापूर येथे पाणी साचलेल्या खड्डय़ात पडून दोन लहान मुले मरण पावली. नागपुरात पावसाचा सर्वाधिक तडाखा नंदनवन-खरबी रोड या भागांना बसला. खरबी वस्तीतील नाल्याला पूर आल्याने वाहून गेलेल्या तीन मुलांना लोकांनी वाचवले. मात्र, नंदनवन परिसरात खड्डय़ात साचलेल्या पाण्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाला.