एका बाजूला अजस्र कंटेनर्स वाहून नेणारे ट्रक, दुसऱ्या बाजूला अर्धा कच्चा सीमेंटचा रस्ता आणि मधोमध अक्षरश: चाळण झालेला रस्ता.. महापे ते शिळफाटा अशा सुमारे पाच ते सात किलोमीटरच्या रस्त्याची ही दुरवस्था. चाळण झालेल्या या रस्त्यावरून वाहने हाकताना वाहनचालकांची अक्षरश: गाळण उडू लागली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी पालकमंत्री गणेश नाईक स्वत: आग्रही होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी खडय़ा आवाजात संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेशही देऊ केले होते. प्रत्यक्षात या रस्त्यावर फुटभर खोलीचे खड्डे पडले असून यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे. 
महापे-शिळफाटा रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम गेल्याच वर्षी झाले. हा रस्ता आणखी रुंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी सुरू झालेले हे काम आता मात्र ठप्प पडले आहे. अर्धकच्चा सीमेंटचा रस्ता एका बाजूला आणि मुख्य रस्त्यावर खडी-डांबर टाकून केलेली तात्पुरती मलमपट्टी पावसाळ्यात उखडून गेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून (याला रस्ता तरी कसे म्हणावे, हा प्रश्नच आहे) जीव मुठीत धरूनच वाहन हाकावे लागते. डांबरीकरणाच्या नावाखाली टाकण्यात आलेली वाळू, खडी पावसामुळे उघडी पडली आहे. रस्त्यावर वाळूचे साम्राज्य आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. वाळूतून गाडी चालवताना गाडी घसरण्याचा धोका असतो. अगदी तसाच अनुभव या रस्त्यावर येतो. त्यातच रस्त्यावर गोलाकार असे खड्डे पडले आहेत. हे कमी म्हणून की काय या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या डोंगरातून धबाधब्याचे पाणी रस्त्यावर येत असते. हे पाणी या खड्डयात साचते. साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकाला या रस्त्यावरून वाहने हाकताना पुन्हा एकदा कसरत करावी लागते.
शीळ-महापे या सुमारे पाच ते सात किमी रस्त्याच्या पट्टय़ात पथदीपांची सोय नाही. या मार्गावर वाहतूक पोलिसांचे एक चेक पोस्ट आहे. मात्र ते फक्त सायंकाळपर्यंत सुरू असते. मुंबई-नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करणे आणि त्यांची नोंद एका वहीत करणे एवढे काम या चेकपोस्टवरून चालते. चाळण झालेल्या या रस्त्यावर दुर्दैवाने एखादी दुर्घटना झालीच तर वाहतूक कोंडी होण्याचा संभव आहे. एरवीही मोठय़ा खड्डयांमुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असते. महापे-शिळफाटा हा मार्ग मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. शिवाय महापेमध्ये एल अँड टी, फायझर वैगरेसारख्या नामांकित कंपन्या तसेच आयटी पार्कही आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वाहनांचा राबता असतो. येथून जाणाऱ्या वाहनांना दुसरा पर्यायी मार्ग नाही. असे मार्ग मुंब्रा बायपास किंवा पनवेलमाग्रे असले तरी ते लांबचे आहेत. त्यामुळे हाच मार्ग सोयीस्कर ठरत असल्याने २४ तास या मार्गावर वाहतूक असते.
२४ तास धोका
मोठमोठे कंटेनर्स ते एनएमएमटी-केडीएमटीच्या गाडय़ा, बाइक, कार, ट्रेलर, ट्रक या प्रकारच्या गाडय़ांचाही या रस्त्यावर राबता असतो. चाळणी झालेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. हा रस्ता ज्यांच्या अधिकारक्षेत्रात येतो त्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या दोन्ही संस्थांना या रस्त्याची जराशीही काळजी नाही. रस्त्याच्या दुरवस्थेविषयी विचारणा करण्यासाठी सातत्याने संपर्क साधूनही या दोन्ही यंत्रणांचे संबंधित अधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेरच होते.