परभणी शहरात रात्रीची गस्त वाढवून वर्दळीच्या ठिकाणी भरारी पथकाची नेमणूक करून मुली व महिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी परभणी न्यायालयातील महिला वकिलांनी केली. महिला वकिलांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. शहरातील सुयोग कॉलनीतील एका महिलेसह तिच्या मुलीला चाकूचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न गावगुंडांनी केला. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी गावगुंडांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. शहरातील वातावरण सुरक्षित वाटावे व निर्भयपणे वावरता यावे, यासाठी गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. वर्दळीच्या ठिकाणीही भरारी पथक स्थापन करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी महिला वकिलांनी केली.