मुंब्रा परिसरातील एका इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या चार संशयित दरोडेखोरांना मुंब्रा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून त्यांचे दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या चौघांकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि सुरा, असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातून गावठी कट्टा आणला असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गुड्डू ऊर्फ मुक्तार अहमद सिद्धिकी (२१), अजय गेजू प्रजापती (१९), समीर अहमद सिद्धिकी (१९) आणि फईम अहमद मुख्तार अहमद सिद्धिकी (२९), अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांचा फरार असलेला साथीदार शमीम याच्या बहिणीने मुंब्रा परिसरातील आशिया बुसरा या इमारतीमध्ये घर भाडय़ाने घेतले होते. त्यामध्येच हे सर्वजण राहत होते. तसेच हे सर्वजण लोकलमध्ये इमिटेशन दागिने विक्रीचे काम करतात. मुंब्रा पोलिसांचे पथक गुरुवारी परिसरात गस्त घालीत असताना त्यांना एक व्यक्ती घाबरलेल्या स्थितीमध्ये पळून जाताना दिसली. पाठलाग करून पथकाने त्याला पकडले असता, त्याने आशिया बुसरा इमारतीमध्ये राहणाऱ्या या सर्वाची माहिती दिली. तसेच धमकावून माझ्याकडूनही पाचशे रुपये त्यांनी काढून घेतले, असेही त्याने पथकाला सांगितले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवशंकर मुंडे यांच्या पथकाने या घरामध्ये धाड टाकून चौघांना अटक केली तर त्यांचे दोन साथीदार मात्र, पळून गेले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त अमित काळे यांनी दिली. उत्तर प्रदेश येथून त्यांनी गावठी कट्टा आणला होता आणि ते सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. तसेच या टोळीने यापूर्वी दरोडासंबंधीचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.