माझगाव येथील महिला विक्रीकर अधिकारी सुषमा वायदंडे यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ९० हजारांची लाच घेताना अटक केली. विशेष म्हणजे दोन स्वतंत्र तक्रारींवरून एकाच वेळी दोन वेगळे सापळे लावण्यात आले होते.
पहिली तक्रार गिरगावातील एका स्टील व्यापाऱ्याची होती. त्यांच्या जुन्या दुकानाविरोधात विक्रीकर विभागाने नोटीस काढली होती. ती सेल्स टॅक्स प्रोसिडिंग असेसमेन्टबाबतची एक्स पार्टी ऑर्डर रद्द करण्यासाठी वायदंडे यांनी या व्यापाऱ्याकडे १ लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम ८० हजारांवर ठरली. दुसरी तक्रार एका कापड व्यापाऱ्याची होती. विक्रीकराची रक्क्म कमी करून देण्यासाठी त्याच्याकडे वायदंडे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. या दोन्ही तक्रारींवरून लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने मंगळवारी वायदंडे यांच्या माझगाव येथील विक्रीकर भवनातील कार्यालयात सापळा लावला होता. त्यावेळी दोन्ही प्रकरणातील ९० हजार रुपये घेताना वायदंडे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.