२१ जानेवारीच्या सायंकाळी शहराजवळ महामार्गावर जीप चालकाला पिस्तुलचा धाक दाखवित ५३ लाख रुपयांची लूट करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पारोळा येथील जीप मालकाच्या पुतण्याला महामार्गावरील पिंपळकोठा गावाजवळ स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवित ५३ लाख रुपयांची लूट केली होती.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या लूट प्रकरणातील प्रमुख संशयित दीपक पवार हा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. जळगाव जिल्ह्यातील तसेच सुरत येथील संशयिताच्या सर्व नातलगांकडे तपास पथके पाठविण्यात आली होती. अखेर तो स्वत:हून मंगळवारी दुपारी एरंडोल पोलीस ठाण्यात उपस्थित झाला. लुटीच्या या घटनेत पारोळा येथे राहणाऱ्या दीपक पवारसह सुनील पवार, भुसावळ येथील गिरीश तायडे, देवभाने येथील हरी देसले व सलिम उर्फ शकील शेख या पाच जणांसह आणखी दोघांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यापैकी दीपकसह तिघांना अटक करण्यात आले आहे.
५३ लाखांची लूट केल्यानंतर फरार झालेले सर्वजण रात्री भुसावळ येथे आले. तेथेच त्यांनी पैशांची वाटणी केली. वाटणीत ११ लाख रुपये दीपकच्या वाटय़ाला आले होते. निरीक्षक डी. डी. गवारे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी बजावली.