शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत देवसिंह लक्ष्मण शेंद्रे या शेतकऱ्याने केलेल्या अर्जाकडे दुर्लक्ष करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकास वारंवार नोटिसा बजावूनही तो न्यायालयात हजर झाला नाही. त्यामुळे त्यास जामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याचे आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. पी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने दिले.
सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथील पद्मिनीबाई लक्ष्मण शेंद्रे यांचा २६ ऑगस्ट २००८ रोजी तुटलेल्या विजेच्या तारेला चिकटून मृत्यू झाला. त्यांना शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून रक्कम मिळावी, असा अर्ज कृषी अधिकाऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला. वारंवार पाठपुरावा करूनही हाती काहीच न लागल्याने देवसिंह शेंद्रे यांनी अ‍ॅड. आर. पी. भूमकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली. प्रतिवादी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकांना नोटीस बजावूनही ते हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले.