परभणी शहरातील कॅपझोन ट्रेडर्स प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून पोलिसांनी ९ लाख ५५ हजार १०० रुपये रोख रक्कम व काही संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई झाली. दहा हजार व त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्यांना दोन वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याची योजना या कंपनीच्या वतीने चालविण्यात येत आहे.
१०, २०, ५० हजार व त्यापुढे एक लाखाच्या पटीत रक्कम गुंतवा व दोन वर्षांत दामदुप्पट करा, अशी ही योजना कॅपझोनतर्फे परभणीत १५ ऑगस्ट २०१२पासून चालविली जात आहे. कंपनीचे येथील प्रमुख नारायण शहाणे आहेत. कंपनीचे मूळ मालक यवतमाळ येथील रवींद्र वसंत चौधरी आहेत. कंपनीमार्फत गुंतवणूकदारांकडून दहा हजारांच्या पटीत रक्कम घेतली जाते व गुंतवणूकदाराला दहा हजारांवर ८५० रुपयांप्रमाणे प्रत्येक महिन्याचे २४ धनादेश दिले जातात.
मात्र, कॅपझोनकडून चालविण्यात येणाऱ्या योजनेवर अनेकांनी संशय व्यक्त केला. सोमवारी याबाबत पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे तक्रार आली. रात्री नऊच्या सुमारास पाटील यांनी कॅपझोनची तपासणी करण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश देशमुख व नवा मोंढय़ाचे सहायक निरीक्षक तानाजी दराडे यांना डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या हॉस्पिटलजवळ असलेल्या कंपनीच्या कार्यालयात पाठविले. देशमुख व दराडे यांनी पहाटे तीनपर्यंत कॅपझोनच्या कार्यालयाची झडती घेतली. झडतीत काही संशयास्पद कागदपत्रे, तसेच चंद्रभागा कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या राजर्षी शाहूमहाराज मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे धनादेश पुस्तक व कपाटात ९ लाख ५५ हजार १०० रुपये रोख रक्कम आढळली. पोलिसांनी कागदपत्रांसह रक्कम ताब्यात घेतली. नारायण शहाणे, त्यांचे सहकारी अशोक आश्रोबा डोंगरे, बाबूराव खंदारे, श्रीराम राऊत, परमवीर कदम, निखिल मालेकर, सखाराम कदम यांना ताब्यात घेतले. कॅपझोनबाबत अधिक माहिती यवतमाळ येथील रवींद्र चौधरी हे देऊ शकतात, अशी त्रोटक माहिती त्यांच्याकडून मिळाली. त्यामुळे नवा मोंढा पोलिसांनी चौधरी यांच्याशी संपर्क साधून चौकशीसाठी हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्यापर्यंत (बुधवार) चौधरी पोलिसांसमोर हजर होतील, अशी शक्यता आहे.