चुलत्याच्या घरावर दरोडा घालणा-या पुतण्याला राहुरी पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यात तीन आरोपींना पूर्वीच अटक करण्यात आली असून चौघे आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
एक महिन्यापूर्वी निंभेरे (ता. राहुरी) येथील गजानन सांगळे यांच्या घरावर सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दहा तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन हजार रुपये रोख व एक मोबाइल चोरून नेला होता. सहायक  पोलीस निरीक्षक महावीर परमार यांनी या गुन्ह्याचा तपास करून चौघा आरोपींना पकडले. सांगळे यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा सूत्रधार हा त्यांचा पुतण्या गणेश नितीन सांगळे (रा. बारागावनांदूर) हा असल्याचे निष्पन्न झाले. हा दरोडा वैमनस्यातून नव्हे तर पैशासाठी टाकण्यात आला असे तपासात निष्पन्न झाले.
गणेश सांगळे हा पुणे शहरातील मोटारसायकल चो-यांमधील आरोपी आहे. त्याची पाथर्डी व राहुरीतील दरोडेखोरांशी मैत्री आहे. सांगळे याने या आरोपींना दरोडा टाकण्यासाठी बोलावून घेतले. त्यांनी टाकलेल्या दरोडय़ातील सोने वाटून घेतले. दरोडय़ात चोरलेला मोबाइल हा पाथर्डी येथील एका आरोपीकडे होता. या मोबाइलचा तो वापर करत होता. मोबाइल टॉवरच्या ठिकाणाच्या आधारे आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. पकडलेल्या तिघा आरोपींनी दरोडय़ाचा सूत्रधार गणेश सांगळे हा असल्याची कबुली दिली. आता आणखी काही गुन्हे या आरोपीकडून उघड होण्याची शक्यता आहे.