जेएनपीटी बंदर परिसरात रविवारी झालेल्या जाळपोळीनंतर तणावपूर्ण शांतता असून या विभागात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पोलिसांवर केलेल्या दगडफेक,गाडीची जाळपोळप्रकरणी २५ कंटेनर चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर दंगल पसरविणे तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच इतरांचीही चौकशी सुरू असून आणखी काही चालकांना ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. तर या घटनेनंतर जेएनपीटी परिसरातील वाहतुक सुरळीत सुरू आहे.
असुविधांनी त्रस्त झालेले जेएनपीटी परिसरातील कंटेनर वाहनचालकांनी केलेल्या दगडफेकीनंतर घटनेची माहिती घेऊन तोडगा काढण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस, जेएनपीटी प्रशासन तसेच इतर बंदरांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाहनचालकांच्या उद्रेकावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, कंटेनर वाहनांच्या मालकांनी चालकांना झालेल्या मारहाणीचा निषेध करीत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या संदर्भात सोमवारी जेएनपीटी परिसरात कंटेनरमालकांची बैठक होणार असल्याची माहिती कंटेनरमालक संघटनेच्या सूत्रांनी दिली आहे.
या दंगलीत सहभागी असलेल्या कंटेनरचालकाचा शोध सुरू असून पोलिसांकडून या दंगलीत सहभागी असलेल्या अटक करण्यात येईल, अशी माहिती न्हावा-शेवा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे. जेएनपीटी बंदर परिसरातील वातावरण शांत असल्याचे मत नवी मुंबई झोन-२ चे उपायुक्त संजयसिंग ऐनापुरे यांनी व्यक्त केले आहे.
जेएनपीटी परिसरातील खासगी तसेच जेएनपीटी बंदरातील कंटेनर हाताळणीसंदर्भात घडणाऱ्या घटनांचा परिणाम येथील स्थानिक नागरिकांवरही होत आहे.
बंदरात जड कंटेनर वाहने जात नसल्याने ती कित्येक दिवस रस्त्यावरच उभी राहत असल्याने एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. यासाठी जेएनपीटीने पुढाकार घेऊन सर्व सुविधांनी युक्त वाहनतळे उभारावीत तसेच राज्य सरकारकडे अपघातग्रस्तांच्या निधी समितीची लवकरात लवकर मान्यता आणावी, अशी मागणी उरण सामाजिक संस्थेच्या वतीने संतोष पवार यांनी केली आहे.