कलाकारांच्या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर कलामहोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. हा महोत्सव एक डिसेंबरपासून सुरू होत आहे. महोत्सवास प्रतिसाद लाभत असून साडेसातशेहून अधिक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
या महोत्सवात ३० नोव्हेंबर रोजी अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी कलाकृती प्रदर्शन होणार आहे. एक डिसेंबरपासून कलाप्रदर्शनास प्रारंभ होईल. प्रदर्शन पाच डिसेंबपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील.
दोन डिसेंबर रोजी टाऊन हॉलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धा होणार आहे, तर एक त पाच डिसेंबर या काळात स्थानिक कलाकारांची चित्र- शिल्प प्रात्यक्षिके, त्याच दिवशी  सायंकाळी पाच कलाविषयक फिल्म व स्लाईड शो आयोजित केले जाणार आहेत. प्रदर्शन शाहू स्मारक भवन आणि दसरा चौक मैदानात होणार आहेत. याचे समन्वयक म्हणून चित्रकार प्रशांत जाधव, रियाज शेख काम पहात आहेत.
महोत्सवात कला क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय कलापरंपरेबद्दल ते मते मांडणार असून, ही कला विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळाच ठरणार आहे.
स्थानिक कलाकारांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी बाहेरील लोकांना कोल्हापुरात बोलावून कलाकृती दाखविल्या तर त्यांचे चांगले मार्केटिंग होईल, या विचाराने हा महोत्सव आयोजित केल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.