News Flash

‘आता प्रेक्षकांच्या कलानेच कलेची अभिव्यक्ती’

साहित्य संमेलनातील परिसंवादाचा सूर कोणतीही कलासाधना माणसाला समृद्ध करीत असली आणि त्यामुळे जीवन अर्थपूर्ण होत असले तरीही प्रत्यक्ष आयुष्य हे त्यापेक्षा कितीतरी मोठे असते.

| June 4, 2013 08:26 am

साहित्य संमेलनातील परिसंवादाचा सूर  
कोणतीही कलासाधना माणसाला समृद्ध करीत असली आणि त्यामुळे जीवन अर्थपूर्ण होत असले तरीही प्रत्यक्ष आयुष्य हे त्यापेक्षा कितीतरी मोठे असते. त्यामुळे कलेसाठी जीवन हा निव्वळ भ्रम असून जीवनासाठी कला हेच खरे वास्तव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार वामन तावडे यांनी अंबरनाथ येथे चौथ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात शनिवारी ‘कला, कलावंत आणि साहित्य’ या विषयावरील परिसंवादात बोलताना केले.
 अभिव्यक्त होणे ही प्रत्येक माणसाची मूलभूत प्रवृत्ती असून त्यासाठी निरनिराळ्या कला माध्यम म्हणून वापरल्या जातात. समाजातील निरनिराळ्या वृत्ती-प्रवृत्तींचा शोध घेऊन कलावंत त्या ठळकपणे आपल्या कलाकृतींमधून मांडत असतात, असे मत अभिनेते-दिग्दर्शक अनिल गवस यांनी मांडले.
मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांच्या चरित्राची ओळख करून देणारा चित्रपट अथवा मालिका का निर्माण होत नाही, असा प्रश्न एका रसिकाने उपस्थित केला, तेव्हा कलानिर्मितीच्या प्रक्रियेत कलावंतांची प्रेरणा आणि विचार महत्त्वाचे असले तरी व्यावसायिक चौकटीत प्रेक्षकांची आवड, निवडीचाही विचार करावा लागतो. चित्रपट, नाटक आणि मुख्यत: दूरचित्रवाणी विश्वात सध्या मोठय़ा प्रमाणात ‘प्रेक्षकांच्या कलाने कला’ हेच धोरण अवलंबले जाते, असे मत वक्त्यांनी मांडले. निर्माते विलास देशपांडे, दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनीही परिसंवादात भाग घेतला. त्याआधी सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नरेंद्र पाठक, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रोटरीचे गव्हर्नर बाळ इनामदार, नगराध्यक्ष सुनील चौधरी, रोटरीचे नझीर शेख आदींच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक सुनील चौधरी, तर आभार कवी किरण येले यांनी मानले.
शरद पोंक्षेंनी टोचले कान  
शनिवारी रात्री अभिनेते शरद पोंक्षे यांचे बदलापूरला स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर व्याख्यान होते. त्यामुळे त्यांनी अंबरनाथच्या साहित्य संमेलनातील परिसंवादातही सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले होते. बदलापूरच्या व्याख्यानाची वेळ आठ, तर अंबरनाथचा परिसंवाद सहा वाजता होता. त्यामुळे शरद पोंक्षे वेळेवर संमेलनस्थळी उपस्थित झाले. मात्र पाहुणे आणि प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत कार्यक्रम सव्वा तास उशिरा म्हणजे सव्वासात वाजता सुरू झाला. तेव्हा यापुढे कोणत्याही कार्यक्रमात उशिराने येणाऱ्या राजकीय पाहुण्यांची अथवा प्रेक्षकांची वाट पाहू नका. आपल्याशिवायही कार्यक्रम सुरू होऊ शकतो, हे त्यांना कळू द्या, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2013 8:26 am

Web Title: art will be recognize by audience favour
टॅग : Art,Sahitya Samelan
Next Stories
1 लावणी सम्राज्ञीने उलगडला आठवणींचा कोलाज
2 ऐन पावसाळ्यात नवी मुंबई महापालिकेचे नऊ हजार खड्डय़ांचे खोदकाम
3 बदलापूरकरांच्या नशिबी आणखी सहा महिने धोकादायक प्रवास
Just Now!
X