लोकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी प्रत्येक कलाकार धडपडत असतो. त्यातही कलाक्षेत्रातील जुन्याजाणत्या मंडळींसोबत आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळविण्याची इच्छाही त्यांना असते. पण जगभरात होणाऱ्या अशा कलाप्रदर्शनांचे भाडे आणि तेथे आपली चित्रे घेऊन जाण्यासाठी येणारा खर्च याचे गणित सांभाळताना अनेक चित्रकारांची तारेवरची कसरत होते. त्यामुळे प्रत्येकाचीच मुख्यत्वे नव्या होतकरू चित्रकारांची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. पण ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’मार्फत मुंबईतील काही मोजक्या चित्रकारांना त्यांची कला कोरियामध्ये होणाऱ्या ‘एशिया मेनिया, सी-फेस्टिव्हल’मध्ये दाखविण्याची संधी मिळणार आहे.
दर वर्षी कोरियामध्ये सोऊल शहरात ‘एशिया मेनिया, सी-फेस्टिव्हल’ या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनामध्ये जगभरातील नामवंत चित्रकार त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवितात. प्रदर्शनातील आशियायी देशांच्या गटामध्ये भारतीय चित्रपटांच्या गटामध्ये भारतातील चित्रकारांनाही त्यांची चित्रे सादर करण्याची संधी दिली जाते. या वर्षी मुंबईतील ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’च्या अंतर्गत ४३ चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनामध्ये दाखविली जाणार आहेत. यामध्ये काही अनुभवी तसेच नवोदित चित्रकारांचाही खर्च आहे. यामध्ये मुंबईतील चोवीस चित्रकारांचा समावेश असून त्यात मराठमोळ्या चित्रकारांचाही समावेश आहे. भारतभरातून यासाठी चित्रकारांच्या कामाचे नमुने मागविण्यात आले होते. त्यांच्यातील ४३ चित्रकारांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये दिल्ली, चंदिगड, कोलकत्ता या शहरांमधील चित्रकारांचा समावेशही आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय चित्रकारांना संपूर्ण जगासमोर आपली चित्रे सादर करण्याची संधी मिळणारच आहे, पण त्यासोबतच त्यांना अनेक तज्ज्ञ आणि जाणकार मंडळींचे मार्गदर्शही मिळणार असल्याचे ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
या उपक्रमुळे माफक शुक्ल भरून चित्रकारांना आंतराष्ट्रीय प्रदर्शनात कला दाखविण्याची संधी मिळाणार असल्याचे, मुंबईकर चित्रकार अमित नाईक सांगतो. अध्यात्म आणि त्रिकोण ही त्याच्या चित्रांची मूळ प्रेरणा असते आणि कोरियातमध्ये ‘बुद्धा’ विषयावरील दोन चित्रे तो प्रदर्शनात मांडणार आहे. ‘माझ्यासारख्या नवोदित चित्रकारांना अशा प्रकारची संधी मिळणे, पुढच्या वाटचालीसाठी महत्त्वाचे असल्याचे,’ तो सागंतो. भारतीय चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम आयोजित करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत येथे त्यांना थेट परदेशी ग्राहक मिळणार असल्याचे चित्राकार मंगेश काळे यांनी सांगितले. या प्रदर्शनामध्ये त्यांच्या पंचवीस चित्रांची निवड करण्यात आली आहे.