नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी एक वाघ रस्त्यांवर नाचताना लोकांना दिसला. आणि रस्त्यावर वाघ असूनही दारे-खिडक्या बंद करून घरात बसण्याऐवजी लोक रस्त्यावर येऊन त्या वाघाचा नाच बघण्यात दंग झाले होते. कारण हा वाघ म्हणजे जंगलातला खराखुरा वाघ नसून ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे होते. ‘तानी’ या चित्रपटातील एक प्रसंग चित्रित करण्यासाठी नलावडे यांनी वाघाचे सोंग घेऊन अंगभर वाघ रंगवून घेतला होता.
वऱ्हाडी समाजाच्या जनजीवनाचा प्रवास रेखाटण्याचा प्रयत्न ‘तानी’मध्ये करण्यात आला आहे. वऱ्हाडी व्यक्तिरेखा, त्यांचा कुळाचार, संस्कृती, परंपरा वगैरे गोष्टी चित्रपटात जिवंत करण्यात आल्या आहेत. देवीला किंवा ताजुद्दिन बाबाला नवस बोलण्याची परंपरा वऱ्हाडात आहे. मनातली इच्छा पूर्ण झाल्यास गणपती, नवरात्री किंवा उरुसाच्या वेळी मी वाघ बनून नाचेन, अशा प्रकारचा नवस बोलला जातो.
तोच धागा पकडून दिग्दर्शक संजीव कोलते आणि लेखिका गायत्री कोलते यांनी ‘तानी’मध्येही असाच एक प्रसंग टाकला आहे. आपली मुलगी दहावीची परीक्षा पास होऊ दे, असा नवस तानीचे वडील शंकर बोलतात. तानी खरोखरच पास होते. त्या वेळी ते वाघाचे रूप घेऊन नाचतात, असा प्रसंग चित्रपटात आहे.
या दृष्यासाठी अरुण नलावडे यांना डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण वाघाच्या रूपात रंगवण्यात आले होते. त्यासाठी कला दिग्दर्शक नाना मिसाळ यांना आमंत्रित करण्यात आल्याचे कोलते यांनी सांगितले. व्याघ्ररूपी नलावडे यांनीही अंगात संचारल्यासारखे नृत्य करून चांगलीच वाहवा मिळवली.