दरवर्षी जूनच्या एक तारखेला केईम रूग्णालयातील तिची खास खोली सजवलेली असते. याहीवर्षी १ जूनला वॉर्ड क्रमांक चारची खोली अरूणासाठी सजलेली असणार आहे. ४२ वर्ष एका अन्यायाशी झुंज देत जगलेल्या केईएमच्या परिचारिका अरूणा शानबाग यांचा वाढदिवस नेहमी ज्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा व्हायचा त्याच जोशाने अरूणा हे जग सोडून गेल्यावरही तिचा वाढदिवस साजरा होणार आहे. मात्र, यावर्षी वाढदिवसासाठी नविन गाऊन घालून खाटेवर निजलेली अरू णा नसेल. तिच्याबरोबरच्या आठवणींनीच तिचा ६७ वा वाढदिवस केईएममध्ये साजरा करण्यात येणार आहे.
अरूणाचा वाढदिवस यावर्षी तिच्याबरोबर साजरा करता येणार नाही, याचे दु:ख आहेच. मात्र, एखाद्याला आपण जगवायचे ठरवले तर ४२ वर्ष अगदी प्रेमाने, तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत आपण त्याला जगवू शकतो, याचा आनंद जास्त आहे. अरूणा आमच्यातून निघून गेल्याने आमच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती नसली तरी एवढय़ा वर्षांच्या तिच्या आठवणी आहेत. त्या आठवणींच्या साथीनेच तिचा यंदाचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणार असल्याचे केईएमच्या सविता नाईक यांनी सांगितले. अरू णाचा वाढदिवस मोठया प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला असला तरी तो कशापध्दतीने साजरा करायचा याचे तपशील अजून ठरलेले नाहीत. यासंदर्भात, २८ मेला संबंधितांची बैठक होणार असून त्यात अंतिम स्वरूप निश्चित केले जाईल, अशी माहिती नाईक यांनी दिली.
केईएमच्या चार पिढय़ांनी अरूणाची सेवा केली आहे. थोडय़ाथोडक्या नाही तर ८०० परिचारिकांनी तिची सेवा केली होती. त्यांच्यापैकी कित्येकांनी अरूणाच्या आठवणी सांगायच्या असतील, तिच्याविषयी बोलायचे असेल, या सगळ्यांचा विचार करून अरूणाशी जोडल्या गेलेल्या सगळ्यांना या कार्यक्रमासाठी एकत्र आणण्यात येणार आहे. अरूणाचा वाढदिवस आणि श्रध्दांजली सभा एकाच दिवशी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.