ऐरोली सेक्टर तीनमधील दत्त मेघे महाविद्यालयाच्या नजीक असणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली उभारण्यात आलेल्या झोपडय़ांवर काही दिवसांपूर्वी सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली होती. यावेळी कारवाईत दहा हजार चौमीचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला होता. पण या ठिकाणी झोपडपट्टी दादांनी पुन्हा अनधिकृत झोपडया उभ्या केल्या आहेत. त्यामुळे सिडकोकडून करण्यात आलेली कारवाई ही नावापुरतीच होती का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला असणारा उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणारा भूखंड हा उद्यानासाठी आरक्षित असताना या ठिकाणी अनधिकृतपणे झोपाडय़ा उभारून त्या विकण्याचा धंदा झोपडपट्टी माफियांकडून सुरू आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी  सिडकोला व महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता. अखेर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली. पण सिडकोच्या पथकांची पाठ फिरताच पुन्हा झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिडकोकडून करण्यात आलेली कारवाई ही फक्त दिखाव्यापुरतीच होती का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. यांसदर्भात अतिक्रमण आधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी झोपडय़ा बांधण्यात आल्या असतील तर पुन्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच सदरील भूखंडावर कुंपण घालण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.