राजकीय विजनवासात असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार अशी चर्चा सुरू असली तरी त्यांनी मात्र नांदेड लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व पुन्हा येणार, अशी चर्चा होती. तर कधी ते प्रदेशाध्यक्ष होतील, असेही सांगितले जात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर त्यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी ते मात्र यासाठी उत्सुक नाहीत. राज्याचे प्रमुख पद उपभोगल्यानंतर राज्यात मंत्री म्हणून काम करण्यापेक्षा केंद्रात जावे, असा सल्ला त्यांना काहींनी दिला. स्वत: चव्हाण मात्र केंद्रात जाण्याच्या मन:स्थितीत नसून गेल्या काही दिवसांपासून लोकसभा मतदारसंघाची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. सर्वच पक्षांतील स्थानिक नेत्यांशी संपर्क वाढविला असून, वेगवेगळय़ा राजकीय कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ते आवर्जून सहभागी होत आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी हदगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर खासदार सुभाष देशमुख यांची त्यांनी भेट घेतली. रविवारी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर यांच्या कन्येच्या विवाह सोहळय़ाला मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे ते उपस्थित होते. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. महापालिकेतील निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्यानंतर चव्हाण यांनी अन्य विषयांवरही चर्चा केली. पण चर्चेच्या केंद्रस्थानी लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या संभाजी पवार यांचेच नाव होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबाबत जाहीर भाष्य केले नाही. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या आश्वासनांबाबत ‘ब्र’ही काढला नाही. भोकर विधानसभा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे. पण श्रेष्ठींनी ऐनवेळी लोकसभा निवडणूक लढविण्यास सांगितले, तर त्या दृष्टीने तयारी असावी म्हणून संपर्क वाढविल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
नांदेड लोकसभेसाठी विरोधी पक्षाकडून प्रबळ नाव नाही. शिवसेना-भाजपमध्ये मरगळ आहे. मतदारसंघ युतीच्या वाटय़ात भाजपकडे असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला टक्कर देईल, असा उमेदवार नाही. माजी खासदार डी. बी. पाटील राष्ट्रवादीत गेले, तर संभाजी पवार यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या कार्याविषयी युतीचे कार्यकर्ते साशंक आहेत.