नांदेड जिल्हय़ातल्या अर्धापूर येथे निसर्ग पर्यटन उद्यान उभारले जात आहे. आगामी वर्षभरात हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. निसर्गाचा समतोल कायम राहावा, प्राणी-पक्षी-वृक्ष यांची माहिती सामान्यांना सहजतेने उपलब्ध व्हावी, पर्यटनविकासाला चालना मिळावी, यासाठी नांदेड जिल्हय़ातल्या अर्धापूर येथे निसर्ग पर्यटन उद्यान स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात येणाऱ्या नांदेड-नागपूर महामार्गावरील अर्धापूर येथे हे उद्यान उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली होती. ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या उद्यानात जॉगिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक यांसह भव्य सभामंडपही उभारण्यात आला आहे. चार हेक्टर वनक्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या उद्यानामध्ये झाडे, प्राणी तसेच फुलांची लेखी स्वरूपात माहिती लावण्यात आली आहे. फलकाद्वारे संबंधित प्राणी-पक्षी व वृक्षांचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेड जिल्हय़ात हे उद्यान उभारण्यात येत असून भविष्यात याच उद्यानात फुलपाखरू उद्यान, बाल उद्यान उभारण्यात येणार आहे. या उद्यानात स्वतंत्र रोपवाटिका आहे. त्यात सागवान, सिसम, करंज, बांबू यांसारखी झाडे आहेत. उपवनसंरक्षक जी. पी. गरड व वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक शंकरवार यांच्या परिश्रमाने हे उद्यान उभारले जात आहे.
निसर्ग पर्यटन उद्यानासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य शासनाने या निधीची तरतूद केली असून, वर्षभरात हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. सामान्यांना निसर्गाविषयी आस्था निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक शंकरवार यांनी सांगितले.