आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणारे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी येथील आदिवासी विकास भवन परिसरात सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनास बुधवारी १५ दिवस पूर्ण होत आहेत. मात्र प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी आता गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
आदिवासी विकासमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार या विभागाच्या आयुक्तांनी लेखी आश्वासनात भरती प्रक्रिया राबविली जाणार नाही याबद्दल उल्लेख टाळण्यात आल्याने, बिऱ्हाड आंदोलन सलग १४व्या दिवशीही सुरू राहिले. भरती प्रक्रियेचा मुद्दा आश्वासन यावर आंदोलक ठाम आहेत. दुसरीकडे सलग सुरू असलेल्या आंदोलनामुळे बहुतांश आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळली असून, २५ हून अधिक आंदोलक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या संदर्भात आदिवासीमंत्री विष्णू सावरा यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. प्रदीर्घ काळ आश्रमशाळांमध्ये सेवा करूनही शासन कायम करण्याबाबत दिरंगाई करत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी मांडली.
रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करत आहे. त्या अनुषंगाने दीड हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली असल्याचे सावरा यांनी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या विभागाचे आयुक्त लेखी स्वरूपात आश्वासन देणार होते. मात्र आयुक्तांनी लेखी आश्वासनात भरती प्रक्रियेचा उल्लेख टाळला. या मुद्दय़ावरून आयुक्त व आंदोलकांमध्ये तेढ निर्माण झाली असून, ती सलग १५व्या दिवशीही कायम आहे.
शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. असे असताना सोमवारी आदिवासी आयुक्तांनी आंदोलकांविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकी पेशाला कोणताही डाग लागू नये असा आमचा प्रयत्न आहे. असे असताना आयुक्तांनी आंदोलक घेराव घालणार असल्याचे सांगून सोमवारी पोलीस बंदोबस्त मागवून घेतला. या बंदोबस्तात ते कार्यालयाबाहेर पडले. प्रशासनाने या कृतीद्वारे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आंदोलकांनी केली.
या आंदोलनाचा शासन व प्रशासनावर काहीच परिणाम होत नसल्याने बिऱ्हाड आंदोलनकर्त्यांनी आता आमरण उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. बुधवारी आंदोलनास १५ दिवस पूर्ण होत आहेत. १६व्या दिवसापासून आमरण उपोषण केले जाणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी संदीप भाबड यांनी सांगितले.