देशातील नेत्यांकडूनच लक्ष्मीदर्शनाची भाषा करून मतांसाठी पैसे घ्या, मात्र मत आम्हाला द्या, अशी अपेक्षा व्यक्त करीत मतांसाठीच्या पैशांचे जाहीर समर्थन केले जात असल्याने जिल्हा परिषदेसाठी मतदारांना एका मतासाठी एक ते पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीतील मतासाठी दुप्पट दर देण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुरुवातीला मताला दोन हजार रुपयांचे वाटप सुरू असून शेवटच्या क्षणापर्यंत यामध्ये तिपटीने वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचीही तयारी उमेदवारांनी केली असल्याने या निवडणुकीतील उमेदवारांच्या मागे तरुणांचे तांडेच्या तांडे फिरताना दिसत आहेत.
तरुणांना बदल हवा असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत अनेक तरुण सक्रिय झाले होते. त्याचा परिणाम झाला आणि प्रस्थापितांना सत्तेपासून दूर व्हावे लागले. त्याचीच पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत. मात्र या निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच एकंदरीत किती मतदान होणार, आपल्या पक्षाची किती मते, आपल्याला किती मिळणार, त्याचप्रमाणे पैशावर किती मते घ्यायची याचा अंदाज आधीच बांधला होता. त्यानुसार आर्थिक तरतूदही अनेक उमेदवारांनी केली आहे. याची सुरुवात मतदारसंघातील तरुण व युवक मंडळांच्या गणेश व सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देणगी देऊन केली होती. राजकीय पक्ष व त्यांची विचारसरणी ही निवडणुकीतील केवळ बोलण्याची भाषा झाली आहे. त्याचप्रमाणे जे निवडून येतात त्यांच्या मालमत्ता पाच वर्षांत शेकडो पटीने वाढल्याची उदाहरणे दिसत असल्याने सध्या अनेक पक्षांचे तरुण कार्यकर्तेही निवडणुकीत हातात पैसे आल्याशिवाय कामाला लागत नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका उमेदवाराने दिली आहे. त्यामुळे निवडणुकीत पैसा हाच मुख्य आधार ठरू लागला आहे. त्यामुळे मतदारांना आमिषे दाखविणाऱ्यांना सध्या मतदार मागणी करील त्याप्रमाणे रकम मोजावी लागते. जो उमेदवार त्यांची मागणी पूर्ण करील त्यालाच मते मिळतात हाच अनुभव अनेक उमेदवारांना आला असल्याने त्यानुसार मतखरेदीसाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे.