News Flash

जि.प. निवडणुकीतील धुरंधरांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे आगामी निवडणुकीतील संघर्षांची नांदी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्याने सर्वच राजकीय पक्षांतील धुरंधरांनी केलेले ओंगळवाणे शक्तीप्रदर्शन आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या प्रखर संघर्षांची नांदी ठरले आहे.

| September 23, 2014 07:35 am

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्याने सर्वच राजकीय पक्षांतील धुरंधरांनी केलेले ओंगळवाणे शक्तीप्रदर्शन आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या प्रखर संघर्षांची नांदी ठरले आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात वादावादी व शिवीगाळ व त्यामुळे भयभीत झालेल्या महिलांना पोलीस संरक्षणात बाहेर पडावे लागण्याची आपत्ती, पैशाची प्रचंड उलाढाल, सदस्यांची पळवापळवी, असे गावकीच्या राजकारणातील सर्व प्रयोग या मिनी मंत्रालयासाठी घडले. पालकमंत्री रणजित कांबळे, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार दादाराव केचे, खासदार रामदास तडस हे या नाटय़ास कारणीभूत ठरल्याचा आरोप केला जात आहे. भाजप पक्ष प्रवेशाच्या वेळी दत्ता मेघे यांनी पालकमंत्री रणजित कांबळे व आमदार प्रा.सुरेश देशमुख यांचे राजकारण संपुष्टात आणण्याची जाहीर गर्जना केली होती. जि.प.च्या निवडणुकीनंतर त्यांनी आता पहिलीच फे री आटोपली असून दुसऱ्या फे रीतही चमत्कार करण्याचा दावा प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला. समंजस व सहिष्णू, अशी प्रतिमा असणाऱ्या मेघेंचे हे नवेच स्वरूप राजकीय वर्तुळाने पाहिले. पालकमंत्री रणजित कांबळे हे कच्च्या गुरूचे चेले नसल्याचे सर्वश्रूतच आहे. कांॅग्रेसमध्ये असतांना मेघेंना घायकुतीस आणणाऱ्या कांबळेंना त्यांच्या राजकीय आयुष्यात प्रथमच अशी नामुष्की पाहावी लागली. त्यांचे जि.प. सदस्य त्यांनाच वाकुल्या दाखवून गेले. अपमानास्पद पराभव होत असल्याचे दिसून आल्यावर त्यांच्या काही समर्थकांनी सभागृहात हमरातुमरीवर येण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच बंडखोर राकॉ व कांॅग्रेसच्या महिला सदस्यांची ओढताण करण्याच्या प्रयत्नाने सर्वच अवा्क झाले, पण प्रयत्न फ सले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात हा असा पहिलाच प्रकार घडला, तसेच कॉंग्रेसचे सदस्य पळून जातात. काही सभागृहात येऊनही भाजपला मतदान करतात, हे सुध्दा कांॅग्रेसच्या राजकारणास लागलेल्या अमावस्येचे द्योतक ठरले आहे. राकांॅचे हाल तर पाहावेनाचे झाले आहेत. आमदार देशमुखांना भासणारी सक्षम सहकाऱ्यांची उणीव यावेळीही दिसून आली.
इकडे महायुतीमध्येही सगळे आलबेल नव्हते. अध्यक्ष कोणाला करणार, हा कळीचा मुद्या ठरला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लाल दिव्याची गाडी आपल्या मतदारसंघात नेण्यासाठी आमदार दादाराव केचे कमालीचे आतूर झाले होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेले रात्रकालीन आकोंडतांडव थेट पक्षनेते नितीन गडकरी यांच्याकडे पोहोचले. समर्थक सहा सदस्यांना घेऊन गायब झालेले आमदार  केचे हे शेवटी दुसऱ्या दिवशी खासदार तडसांकडे स्वच्छ होत उतरले. त्यांचे कान कोणी पिळले, याचीच चर्चा रंगली. भाजपचे जि.प.नेते मिलिंद भेंडे म्हणाले, आमदार केचे पुढील निवडणूक लक्षात ठेवून पक्षनिष्ठा पाळण्याची आम्हाला अपेक्षा होती. तसेच झाले, असे भेंडे यांनी स्पष्ट करीत या नाटय़ाविषयी भाष्य करण्याचे टाळले. मात्र, या तणातणीत केंचेंना त्यांच्याकडे चालत येणारे अध्यक्षपद मात्र गमवावे लागले. अध्यक्षपदी चित्रा रणनवरे यांची झालेली निवड त्यांचे पती जि.प.सदस्य राणा रणनवरे यांच्या प्रभावाची साक्ष आहे. नागपुरातील उद्योजक व गडकरी शिष्य असलेल्या रणनवरेंनी तीनच वर्षांपूर्वी जिल्ह्य़ात आगमन करीत आता लाल दिवा पटकावला आहे. पालकमंत्री कांबळेंचे शिष्योत्तम माजी जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल यांच्या राजकारणास कुलूप लावणाऱ्या रणनवरेंकडे अध्यक्षपद जाणे, हे कांबळेंना चांगलेच डिवचणारे ठरले आहे. पक्ष प्रवेशानंतर केवळ चारच महिन्यात भाजपला एक मोठी सत्ता मिळवून देणाऱ्या मेघेंनी, दुसरा टप्पा बाकी आहे, असे सांगत नागपूरकडे प्रयाण केले.
कांबळेंचा अपमानास्पद पराभव व मेघेंचा निर्धार, या दोनच बाबी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रखर संघर्षांची नांदी ठरणार आहे. कुठल्याच बाबतीत कमी नसणाऱ्या या दोन्ही राजकीय मल्लांचे वेगळेच स्वरूप पुढे पाहायला मिळणार, हे निश्चित. जिल्हा निवडणूक यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे या संघर्षांचे प्राथमिक चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 7:35 am

Web Title: assembly election 2014
टॅग : Election,Nagpur,Vidarbh
Next Stories
1 जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसींना वेकोलिची केराची टोपली
2 शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर जागा २१ वरून ८४ होणार
3 ‘कोणता झेंडा घेऊ हाती’आघाडी व महायुतीतील कार्यकर्ते संभ्रमात
Just Now!
X