परभणी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासोबतच महापालिकेने मालमत्ता कर, पाणीपट्टी, एलबीटी व दुकानभाडे वसुली दिवाळीपूर्वी करण्याचा निर्धार केला आहे. या पाश्र्वभूमीवर मालमत्ता कराचा भरणा न केल्याने शहरातील रघुवीर व महावीर सिनेमागृह, विष्णू जििनगमधील दोन गोदामांना शुक्रवारी सील ठोकले. वसमत रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडे मालमत्ता कराची एक कोटी थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदार उद्योजकावर नोटिसा बजावण्याची कारवाई चालू असल्याची माहिती उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिली.
शहरात गेल्या १ नोव्हेंबरपासून स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी हा कर भरण्यास विरोध केला. परंतु नंतर जवळपास दीड हजार व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे व्यवसाय नोंदणी केली. पकी ६००च्या आसपास व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कराचा भरणा केला. हा भरणा करताना व्यापाऱ्यांनी व्यवसायातील उलाढालीपेक्षा कमी करभरणा केला. आता जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेसोबतच व्यापाऱ्यांकडून स्थानिक संस्था करवसुलीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक संस्था कर दिवाळीपूर्वी व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यास विशेष तीन पथके स्थापन केली आहेत. ज्या व्यापाऱ्यांनी कराचा भरणा केला नाही किंवा कमी कर भरला त्या सर्वाना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. तसेच शहरात व्यवसाय करूनही नोंदणी न केलेल्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त पुजारी यांनी दिला.
एलबीटीसोबतच मालमत्ता कर, पाणीपट्टी, दुकानभाडे वसुली करण्यासाठीही स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील औद्योगिक वसाहतीत गेल्या कित्येक वर्षांपासून उद्योजकांनी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे आजघडीला एक कोटी थकबाकी झाली आहे. ही थकबाकी वसूल करण्याच्या अनुषंगाने उद्योजकांनाही नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
चित्रपटगृह व गोदामाला सील
जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त एस. पी. सिंह यांनी वसुली विभागातील अधिकाऱ्यांची बठक घेऊन थकबाकीदार मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करून सील ठोकण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील रघुवीर व महावीर चित्रपटगृहास सील ठोकले. महावीर चित्रपटगृहाकडे ४ लाख ५२ हजार ९७४, तर रघुवीर टॉकीजवर १ लाख ९५ हजार ४७९ रुपये थकबाकी आहे. विष्णू जििनगच्या दोन गोदामांना सील ठोकले. या ठिकाणची एकूण थकबाकी १ लाख २० हजार रुपये आहे.
मनपा हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर त्वरित भरावा व जप्ती व दंडाची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त सिंह व उपायुक्त पुजारी यांनी केले आहे.