ठाणे शहराच्या पश्चिमेकडील मानपाडा-माजिवडा परिसरात उभ्या राहात असलेल्या बेकायदा इमल्यांसाठी पोषक असा प्रशासकीय पाया रचला जात असल्याचे स्पष्ट करत याप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेल्या ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांच्यावर कठोर कारवाईचे एकीकडे दावे केले जात असताना आयुक्त असीम गुप्ता यांनी मात्र त्यांची बदली महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असणाऱ्या स्थानिक संस्था कर विभागात (एलबीटी) केल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विद्यमान अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात अंडेबाईंच्या काळात मानपाडा-माजीवडय़ात बेकायदा बांधकामांना कसा ऊत आला होता याची अनेक उदाहरणे नोंदविण्यात आली होती. खुद्द अतिरिक्त आयुक्तांच्या अहवालानंतरही अंडे यांची रवानगी एलबीटी विभागात केली गेल्याने प्रशासकीय गोंधळाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. मुंब्रा-शीळ परिसरातील बेकायदा पायावर उभारण्यात आलेल्या ‘लकी कंपाऊंड’ या इमारतीच्या दुर्घटनेत ७४ निष्पापांचा बळी गेल्यानंतरही महापालिकेतील काही निर्ढावलेले अधिकारी जागे होण्यास तयार नसल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दिसत आहे. मुंब्रा-शीळ दुर्घटनेनंतर महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र आयुक्त असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात दिवा, दातिवली, कळव्यातील काही भाग तसेच मानपाडा, माजिवडा परिसरात पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू झाली आहेत. यासंबंधी वारंवार तक्रारी पुढे येत असतानाही प्रशासकीय स्तरावर फारशा हालचाली होत नसल्याचे चित्र आहे. अशाच एका प्रकरणात महापालिकेत साहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मृदुला अंडे यांच्याविरोधात सातत्याने तक्रारी येत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी गुप्ता यांच्या प्रशासनाने त्यांची बदली थेट एलबीटीसारख्या मोक्याच्या ठिकाणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अहवाल केराच्या टोपलीत
मृदुला अंडे यांच्याकडे मानपाडा-माजिवडा परिसरातील साहाय्यक आयुक्तपदाचा कार्यभार असताना त्यांनी बेकायदा बांधकामांना अभय दिल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या तक्रारींच्या आधारे आयुक्त गुप्ता यांनी याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. रणखांब यांनी सखोल चौकशी करत याप्रकरणी एक अहवाल आयुक्त गुप्ता यांना सादर केला. या अहवालात अंडे यांच्याविरोधात कडक ताशेरे तर ओढण्यात आले शिवाय प्रभाग स्तरावर बेकायदगा बांधकामांना कसे पाठीशी घातले जाते याच्या सुरस कहाण्याही नोंदविण्यात आल्या. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांकडून बांधकामे पाडा असे आदेश देऊनही या परिसरात एकाही बांधकामावर कारवाई करण्यात आली नाही. याशिवाय कोणतेही नवे बांधकाम उभे राहात असेल, तर ‘मला विचारल्याशिवाय बीट रजिस्टरमध्ये त्याची नोंद करू नका’, असा दम अंडेबाई आपल्या कर्मचाऱ्यांना भरायच्या. अतिरिक्त आयुक्त रणखांब यांच्या अहवालात याविषयीची स्पष्ट नोंद आहे.
कारवाईच्या नावाने बोंबच
अतिरीक्त आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल असल्याने सहाय्यक आयुक्त अंडे यांच्याविरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानंतर अहवालाचा अभ्यास करून कारवाई केली जाईल, अशी भूमिका आयुक्त असीम गुप्ता यांनी मांडली होती. अंडे यांची महापालिकेबाहेर बदली केली जावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव प्रशासनाने मंत्रालयात रवाना केला आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानल्या जाणाऱ्या स्थानिक संस्था कर विभागात अंडे यांची बदली करून प्रशासनाने सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अंडे यांच्या बदलीविषयी मंत्रालय स्तरावरून लवकरच कारवाई अपेक्षित आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तान्तला दिली. एलबीटी विभाग आगामी काळात बंद होईल. त्यामुळे अंडे यांची तेथे बदली करण्यात आली आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी अंडे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद होता.
पालिकेच्या सेवेतील ‘टी’ परिमट नसलेली वाहने
MH04 Q 2999, MH05 G 1434, MH06 T 8499, MH 06 AS 1989, MH 04 AJ 7466, MH 04 AA 846, MH 05 1328, MH 05 1896, MH 04 AX 7067, MH 04 BY 1819, MH 04 BC 217, MH 05 CA 1731.