जिल्ह्यातील बोरी अंबेजरी धरणातून ५६ गाव पाणी पुरवठा योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यातील अस्ताने गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणातील पाण्याचा साठा संपल्यामुळे २०-२५ दिवसांपासून नळपाणी पुरवठा योजना बंद झाली असून, त्यामुळे अस्ताने गावात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईला तोंड देण्यासाठी कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या मालेगाव पंचायत समितीच्या निषेधार्थ अस्ताने येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
गावातील विहिरी व कूपनलिका यांना पाणी नसल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ग्रामपंचायतीला पूरक पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर करण्यात यावा म्हणून गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करूनदेखील पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अस्ताने गावापासून चार किलोमीटरवरील राजमाने शिवारात गट नं. ८९ मध्ये वन परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने ही विहीर शासन निर्णयानुसार अधिग्रहित करून गावात पाणी पुरवठा करणे शक्य आहे. पूरक पाणी पुरवठा योजनेसाठी तत्काळ निधी मंजूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा या मागणीसाठी लोक सेनेचे तालुका अध्यक्ष आबासाहेब शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सात मेपासून नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
अस्ताने येथील टंचाईचा गैरफायदा खासगी टँकरचालक घेत असून २०० लिटरची पाण्याची कॅन ५० रुपयांत विकत आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पाणी विकत घेऊन आपली तहान भागवीत आहेत. परंतु ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासमोर कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी प्रश्न तत्काळ शासनाने निकाली न काढल्यास कष्टकरी जनतेला स्थलांतर करण्याशिवाय पर्यायच राहणार नाही.  पाणी प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.